छत्रपती संभाजीनगर Plastic Rice : रेशनिंगमध्ये प्लास्टिक स्वरुपाचे तांदूळ अनेकांना सापडत आहेत. यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरणही पसरलं आहे. हे तांदूळ धुतल्यास ते पाण्यावर तरंगत असून त्यांना जाळलं तर प्लास्टिक सारखे ते चीटकत आहेत. त्याबाबत रेशन दुकानदाराला विचारलं तर तांदूळ वरुनच येतात, असं उत्तर मिळत असल्यानं जेवणात या तांदळांचा वापर करावा की नाही? असा प्रश्न महिलांनी उपस्थितीत केला. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी हे दाणे व्हिटॅमिन आणि प्रोटीन युक्त असून शासनानेच ते मिश्रित केल्याचं सांगितलं.
जेवणात प्लास्टिकचे दाणे असलेला तांदूळ : अनेक भागात तांदळात प्लास्टिकचे दाणे असल्याच्या तक्रारी महिला करत आहेत. अशीच तक्रार पदमपुरा इथं राहणाऱ्या ज्योती कुमावत या महिलेनं 'ईटीव्ही भारत'कडं केली. त्याची शहानिशा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडं असलेले तांदूळ दाखवले. त्यात, काही दाणे वेगळे वाटत होते. हे सर्व दाणे तांदूळ धूत असताना पाण्यावर तरंगत होते. तर काही वेळानं ते आपोआप फुगले असून मुरमुरे पाण्यात टाकल्यासारखे वाटत होते. हे तांदूळ गॅसवर जाळले असता, प्लास्टिक चिटकावं तसं ते चिटकत होते.
काय म्हणाले रेशन दुकानदार : जिल्ह्यातील बहुतांश लोक शासनाकडून मिळणाऱ्या रेशन दुकानातून धान्य भरतात. गेल्या दोन वर्षांपासून या भागातील महिलांना असे दाणे तांदळात आढळत आहेत. त्यामुळं महिलांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत रेशन दुकानदाराकडं तक्रार केली असता, "हे तांदूळ वरुनच येतात, त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही," अशी उत्तर मिळालीत.
हे दाणे पौष्टिक : महिलांनी तक्रार केल्यानंतर 'ईटिव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांच्याशी संपर्क करुन याबाबत सत्यता पडताळणी केली. तांदळातील प्लास्टिक दाण्यांबद्दल त्यांना विचारलं असता, "हे पौष्टिक दाणे आहेत. या तांदळाला एफ आर सी म्हणजे फोर्टिफाइड राइस असं म्हणतात. यात व्हिटॅमिन आणि मिनरल युक्त दाणे आहेत. मागील वर्षी शासनानं अध्यादेश काढून पौष्टिक अन्न देण्यासाठी हा निर्णय घेतला. ज्यांना शंका आहे, त्यांनी ते आमच्याकडं आणावेत, आम्ही त्याची शहानिशा करू," असं स्पष्टीकरण प्रवीण फुलारी यांनी दिलं.
हेही वाचा
- मुंबईच्या लोअर परळ परिसरातील आठ मजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल - Mumbai Building Fire
- गणेशोत्सव 2024; गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील 'हे' महत्वाचे रस्ते राहणार बंद, भाविकांना घ्यावी खबरदारी - Ganeshotsav 2024
- बदलापूर पुन्हा हादरलं; रेल्वे स्थानकात अंदाधूंद गोळीबार, प्रवाशांना मोठा धक्का - Badlapur Firing