नांदेड- दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा ही जनावरांसाठी प्रसिद्ध आहे. नांदेडमध्ये माळेगावची यात्रा सुरू असून, गुरुवारी पशु प्रदर्शन भरवण्यात आलंय. या पशु प्रदर्शनामध्ये फायटर कोंबड्यांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं होते. विविध प्रजातींचे फायटर कोंबडे बाजारात उपलब्ध झाले होते. साधारणत: एका कोंबड्याची किंमत एक ते दोन हजार रुपयांपर्यंत असते. मात्र माळेगाव यात्रेत एका फायटर कोंबड्याची किंमत 20 ते 25 हजार रुपये इतकी होती. केवळ झुंजीसाठी या कोंबड्यांचा वापर केला जातोय. विशेष म्हणजे यात्रेत अगदी उंदरांपासून ते उंटापर्यंत जनावरे खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध असतात. माळेगाव यात्रेच्या बाजारात बिटल प्रजातीचे बकरे दाखल झाले असून, त्यांची किंमत एक लाख रुपयांच्या घरात आहे. या बकऱ्यांचे कान लांब आणि उंची मोठी असते. बिटल प्रजातीचे बकरे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
ग्रेट डेन जातीच्या कुत्र्यांची दहशत :माळेगाव यात्रेत पशु प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी-विक्री केली जाते. खरं तर यात कुत्र्यांचा मोठा बाजार भरवला जातो. बाजारात सेंट बर्नर जातीच्या कुत्र्यानं सगळ्यांना आकर्षित केले असून, स्वीझर्लंडमध्ये आढळणारे सेंट बर्नर प्रजातीचे कुत्रे माळेगाव यात्रेत दाखल झालेत. या कुत्र्यांच्या जातीला ठेवण्यासाठी थंड वातावरणाची गरज असते. या जातीच्या कुत्र्यांची किंमत 45 ते 50 हजार रुपयांपासून दीड लाखांपर्यंत असते. दुसरीकडे ग्रेट डेन जातीच्या कुत्र्यांनाही बाजारात प्रचंड मागणी आहे. शिकारी कुत्रे म्हणून त्यांची ओळख आहे. छोटे पिल्लू 50 ते 55 हजार रुपयांपर्यंत मिळते. तर मोठे कुत्रे हे एक ते दीड लाख रुपयांपर्यंत असतात. या कुत्र्यांना पाहता क्षणी भीती वाटावी, असे ते दिसतात. कुत्र्यांची उंची साडेतीन ते रुंदी चार फुटांपर्यंत असते, त्यामुळे या कुत्र्याला घेण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते.
यात्रेत 30 हजारांपासून 40 लाखांपर्यंतचे घोडे : दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगावच्या यात्रेत गुरुवारी मोठ्या संख्येने घोडे विक्रीला आलेत. घोडेबाजार हे माळेगाव यात्रेचे आकर्षण आहे. यात्रेत सिंध, काठेवाड, धारवाड, पंजाब, नुकरा, स्टॅलॅकन, बाँडा, हुलकारी, पंचकल्याण आदी जातींचे अश्व दाखल आहेत. विशेष म्हणजे 30 हजारांपासून ते 40 लाखांपर्यंत किमतीचे घोडे विक्रीसाठी आलेत.
महाराष्ट्रातील नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या यात्रेनंतर माळेगाव येथील घोडेबाजार प्रसिद्ध आहे. या यात्रेतीलच व्यापारी पुढे माळेगावात दाखल होतात. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात आदी राज्यातून व्यापाऱ्यांनी विविध जातींची घोडे विक्रीसाठी आणले आहेत. गुरुवारी यात्रेचा तिसरा दिवस असतानाही भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते.