मुंबई Mumbai High Court Petition : आक्षेपार्ह वक्तव्यं व भाषणं करण्याच्या प्रकारात गेल्या काही काळात मोठी वाढ झाली. दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य करून दोन समुदायात तेढ निर्माण केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण करण्याचं काम : सातत्यानं आक्षेपार्ह वक्तव्यं करणाऱ्या भाजपाचे आमदार नितेश राणेंविरोधात कारवाई करण्यात आली नाही. नितेश राणे एक समाजद्वेषी असल्याचा आरोप याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलाय. मुख्यमंत्री शिंदे देखील आक्षेपार्ह भाषणं करणाऱ्यांविरोधात कारवाई न करता त्यांची पाठराखण करण्याचं काम करत आहेत, त्यामुळं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली. मुंबईतील वांद्रे येथील रहिवासी मोहम्मद सईद यांनी वकील एजाज नख्वी यांच्यामार्फत ही याचिका दाखल केलीय. या याचिकेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार नितेश राणे, रामगिरी महाराज, हिंदू जनजागृती समिती, गुगल, एक्स, पोलीस महासंचालक यांना प्रतिवादी करण्यात आलंय.