मुंबई ST Buses Issue Konkan :लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात मोठी रणधुमाळी सुरू आहे. यासाठी मुंबईत नोकरीधंद्या निमित्त आलेला चाकरमानी मतदानासाठी आपापल्या मूळ गावाकडे गेल्या दोन दिवसांपासून परततो आहे. मुंबईतील मुंबई सेंट्रल आणि अन्य एसटी डेपो मधून गेल्या दोन दिवसात लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी मतदानासाठी प्रवास केला असल्याचे एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी सांगितले.
दोन दिवसात लाख प्रवासी परतले :मुंबईत नोकरी आणि कामानिमित्त आलेल्या चाकरमान्यांनी मतदानासाठी गावाकडे धाव घेतली आहे. एसटी महामंडळाच्या गाड्यांमधून 5 मे रोजी 244 नियमित बसेस सोडल्या तर आणखी आठ जादा बसेस या प्रवाशांसाठी सोडाव्या लागल्या. 5 मे रोजी 44 हजार 600 प्रवाशांनी प्रवास केला. तर 6 मे रोजी एसटी महामंडळाने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये एसटी बसेस सोडल्या. 250 बसेस नियमितपणे चालवल्या गेल्याशिवाय 8 बसेस जादा चालवण्यात आल्या. याद्वारे सुमारे 50 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. मुंबईतील मुंबई सेंट्रल परळ कुर्ला नेहरू नगर या तीन बस स्थानकातून या बसेस सोडण्यात आल्या असल्याची माहिती भोसले यांनी दिली.
8900 गाड्यांची निवडणूक आयोगाकडून मागणी :राज्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्प्यांमध्ये कर्मचाऱ्यांची आणि निवडणूक आयोग यंत्रणेची वाहतूक करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून या पाच टप्प्यांमध्ये सुमारे 8900 एसटी बसेसची मागणी नोंदवण्यात आली आहे. सध्या राज्य सरकारच्या ताफ्यात केवळ 12000 गाड्या आहेत ज्या रस्त्यांवर धावत आहेत. टप्पा निहाय जरी निवडणूक आयोगाने मागणी केली असली तरी 8900 गाड्या निवडणूक आयोगाला पुरवण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्याचे संपूर्ण पैसेही एसटी महामंडळाला दिले आहेत; मात्र यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाड्यांचा तुटवडा भासत असून अनेक एसटी स्थानकांवर प्रवाशांची झुंबड उडत आहे. एसटीच्या ताफ्यात गाड्या कमी असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे भोसले यांनी मान्य केले आहे.