पुणेNEET exam scam : मागच्या वर्षी २०२३ मध्ये झालेल्या नीट परीक्षेत केवळ दोन विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले होते. यंदा देशात २४ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असताना देखील तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहे. तर या परीक्षेत दोन वर्ष अभ्यास करूनही ६५० पेक्षा अधिक गुण मिळालेल्या मुलांना देखील प्रवेश मिळणार नाही. विद्यार्थी तसेच पालकांकडून यावर आक्षेप घेत नीट परीक्षेत गोंधळ तसंच घोटाळा झाला असल्याचा आरोप या मुलांकडून करण्यात येत आहे. तर पालकांकडून आता झालेली नीट परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. यंदा अचानक गुणांमध्ये झालेली तफावत पाहता पालकांकडून 'एनटीए'वर शंका उपस्थित केली जात आहे.
अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले :अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), केंद्रीय विद्यापीठांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच अभिमत विद्यापीठांमध्ये एमबीबीएस, बीडीएस आणि बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी नीटची परीक्षा घेण्यात येते. यात देशभरातून सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ लाख ४७ हजार ३६ विद्यार्थी आणि ७ लाख ६९ हजार २२२ विद्यार्थिनी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत. यातील खुल्या गटातून ३ लाख ३३ हजार ९३२, ओबीसीतून ६ लाख १८ हजार ८९०, एससीतून १ लाख ७८ हजार ७३८, एसटीतून ६८ हजार ४७९ आणि ईडब्ल्यूएसमधून १ लाख १६ हजार २२९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. देशातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या शासकीय आणि खासगी अशा एकूण ५४९ महाविद्यालयांच्या ७८ हजार ३३ जागांसाठी प्रवेश दिला जातो. मात्र, उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले आहे.