अमरावती Shankar Baba Papalkar Wazzar Model :अनाथ दिव्यांग मुलांचं पालकत्व पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी घेतलं आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना रस्त्यावर सोडून देऊन त्यांचे हाल होऊ नये, यासाठी गत अनेक वर्षांपासून आवाज उठवणारे पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी आवाज उटवला आहे. शंकरबाबा पापळकर यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी केंद्र सरकारकडून तीन सदस्यीय पथक थेट शंकरबाबा पापळकर यांच्या वझ्झर येथील आश्रमात पोहोचलं. शंकरबाबांचं काम पाहून या पथकातील तिन्ही सदस्य भारावून गेलेत. देशातील लाखो अनाथ दिव्यांगांना वयाच्या 18 वर्षानंतर हाल अपेष्टा सोसाव्या लागणार नाहीत, या संदर्भात केंद्र शासन लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करेल. शंकरबाबा पापळकर यांचं वझ्झर मॉडेल देशभर लागू होईल, असा विश्वास केंद्राच्या पथकानं व्यक्त केला. केंद्र शासनानं पाठवलेल्या या तीन सदस्यांच्या पथकानं शंकरबाबा पापळकर यांच्या मेळघाटातील आश्रमात दिवसभर घेतलेल्या आढाव्या संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या विनंतीवरून आलं पथक :राज्यसभा सदस्य डॉ अनिल बोंडे यांनी वयाच्या 18 वर्षावरील दिव्यांगांच्या पुनर्वसनासंदर्भात सरकारनं पावंल उचलावी अशी मागणी सभागृहात केली. त्यासाठी अमरावती जिल्ह्यातील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासंदर्भात केंद्र शासनानं एखादं पथक त्यांच्या आश्रमात पाठवावं, अशी विनंती 31 जुलैला त्यांनी सभागृहात केली होती. डॉ अनिल बोंडे यांनी मांडलेला विषय हा सामाजिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे भारत सरकारच्या दिव्यांग मंत्रालयाचे सचिव रामचरण मीना यांनी राष्ट्रीय न्यास अधिकारी नवनीत कुमार, केंद्रीय प्रकल्प व्यवस्थापन अधिकारी तुकाराम गायकवाड आणि नागपूर येथील बालहक्क आयोगाचे संचालक प्रफुल्ल शिंदे या तीन अधिकाऱ्यांच्या पथकाला शंकरबाबा पापळकर यांचं वझ्झर मॉडेल समजून घेण्यासाठी पाठवलं.
पथकानं साधला मतिमंदांशी संवाद : पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या वझ्झर येथील आश्रमात मंगळवारी दुपारी बारा वाजता पोहोचलेल्या पथकानं सर्वात आधी आश्रमातील दिव्यांग मुलींसोबत संवाद साधला. आश्रमात असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या दिव्यांग मुलींच्या अडचणी जाणून घेतल्या. यानंतर आश्रमात वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली आणि आज 45 ते 50 वर्ष वयोगटात असणाऱ्या अनेक दिव्यांगांशी संवाद साधण्याचा प्रयत्न देखील या पथकानं केला. विशेष म्हणजे या आश्रमातील दिव्यांग युवकांनी या पथकाचं छान स्वागत देखील केलं. शंकरबाबा पापळकर यांना जळगाव येथील रेल्वे स्थानकावर सापडलेली दृष्टीहीन माला आज एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली असून केंद्र शासनाच्या या पथकानं मालाशी देखील दिलखुलास संवाद साधला. शंकरबाबा पापळकर यांनी आश्रम शाळेतील युवती आणि युवकाचं लग्न लावून त्यांना संसार कसा करायचा, याचे धडे देखील महिला स्वयंसेवक आणि पुरुष स्वयंसेवकाच्या माध्यमातून दिले. याबाबतची माहिती कळताच केंद्र शासनाचं पथक अगदी चकित झालं. दिव्यांग मुलांचं आयुष्य देखील पालटू शकते, मात्र त्यासाठी प्रचंड मेहनत आणि योग्य दिशेनं काम करणं महत्त्वाचं असल्याचं यावेळी शंकरबाबा पापळकर यांनी पथकातील अधिकाऱ्यांना बोलताना सांगितलं.
माझ्यानंतर काय, शंकरबाबांच्या प्रश्नांना पथक अवाक :शासनाच्या नियमानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या दिव्यांग मुलांना शाळेत किंवा आश्रमात ठेवता येत नाही. मी मात्र शासनाच्या नियमाविरोधात या ठिकाणी या मुलांचा सांभाळ करतो आहे. आज माझं वय 83 वर्ष असून उद्या मी जग सोडून गेलो, तर या दिव्यांग मुलांचं काय होणार, यासंदर्भात सरकारकडं काही उत्तर आहे का? असा सवाल शंकरबाबा पापळकर यांनी विचारला. मात्र त्यांच्या या सवालानं पथकातील सदस्य अवाक झालेत. शासनानं या अनाथ दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून त्यांची आयुष्यभर काळजी घ्यावी, अशी विनंती शंकरबाबा पापळकर यांनी पथकातील अधिकाऱ्यांना केली.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून पुनर्वसन : रस्त्यावर फेकलेल्या दिव्यांग बाळांना मी या आश्रमात घेऊन आलो. या मुलांची संडास साफ करणं, नाक साफ करणं अशी काम केली. या मुलांना वळण लावण्याचा प्रयत्न केला. या मतिमंद मुलांना शिकवणं, त्यांच्यासाठी अभ्यासक्रम असणं याला काही एक अर्थ नाही. सर्वसामान्य मुलांप्रमाणं यांना शिकवण्याची गरज नाही, तर त्यांचं पुनर्वसन कसं होईल याकडं खऱ्या अर्थानं लक्ष देण्याची गरज आहे. आमच्या आश्रमात ही सर्व दिव्यांग मुलं वृक्ष लावतात. त्या वृक्षांना पाणी देतात, त्यांचं संगोपन करतात. प्रत्येकाचे वृक्ष ठरले आहेत, प्रत्येक जण आपल्या ठरलेल्या वृक्षांनाच पाणी देतात. त्यांच्या वृक्षांना छोटं फुल जरी आलं, तरी त्याचा आनंद त्यांना मिळतो. या मुलांनी लावलेलं आणि वाढवलेला वृक्ष तोडून विकला तर चाळीस-पन्नास हजार रुपये मिळतात. इतर कुठलंही काम हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोसण्यासाठी असू शकतं, मात्र वृक्षरोपणाद्वारे खऱ्या अर्थानं या अनाथ दिव्यांग मुलांचं पुनर्वसन होऊ शकते, असं शंकरबाबा पापळकर यावेळी म्हणाले.
अभ्यासक्रमाचा काय उपयोग :दिव्यांग मुलांसाठी अभ्यासक्रम तयार करून नेमका काय उपयोग होतो, असा सवाल शंकरबाबा पापळकर यांनी यावेळी केंद्रीय पथकाला विचारला. या मुलांना अभ्यासक्रमाची अजिबात गरज नाही, तर त्यांचं पुनर्वसन कसं होऊ शकेल, या दृष्टीनं खऱ्या अर्थानं विचार होणं गरजेचं आहे. वृक्षारोपणासारख्या कामातून या मुलांचा बुद्ध्यांक वाढण्यास मदत होते. आज दिल्ली, मुंबई सारख्या ठिकाणी देखील वृक्षारोपण करण्यासाठी शासनानं जागा दिली तर दिव्यांग मुलं मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करू शकतात. वृक्षारोपण हे पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचं तर ठरेलच मात्र या दिव्यांग मुलांचं पुनर्वसन करण्यास फायद्याचं आहे. नवी मुंबई सारख्या ठिकाणी असणाऱ्या पहाडावर शासनानं 25 एकर जागा दिली, तर मुंबईतले अठरा वर्ष वयावरील सारे अनाथ दिव्यांगांचं पुनर्वसन शक्य होऊ शकते, असं देखील शंकरबाबा पापळकर केंद्रीय पथकाशी संवाद साधताना म्हणाले.