महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पद्म पुरस्कार 2024 ; अंध, अपंग, 123 निराधार मुलांचा 'आधार' असणाऱ्या शंकर बाबा पापळकरांना 'पद्मश्री'

Padma Award 2024 : वझर इथं शंकर बाबा पापळकर यांचा आश्रम आहे. या आश्रमात शंकर बाबा पापळकर यांची 123 मुलं राहतात. शंकर बाबा पापळकर यांच्या या आश्रमात अंध, अपंग, मंतिमंद आणि निराधार मुलं राहतात. त्यांच्या कार्याचा गौरव करत केंद्र सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार घोषित केला आहे.

Padma Award 2024
शंकर बाबा पापळकर

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2024, 1:21 PM IST

Updated : Jan 26, 2024, 2:35 PM IST

शंकर बाबा पापळकर

अमरावती Padma Award 2024 : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी टेकड्यांच्या कुशीत परतवाडा नजीक वझर या छोट्याशा गावात दिवंगत अंबादास पंत वैद्य मतिमंद अपंग निराधार मुला मुलींचा आश्रम आहे. या आश्रमात असणाऱ्या एकूण 123 मुला मुलींच्या नावापुढं आपलं नाव लावणाऱ्या शंकर बाबा पापळकर यांना पद्मश्री हा मानाचा किताब जाहीर झाला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या शंकर बाबा पापळकर यांची अनाथ, अपंग मूकबधीर मुला-मुलींची काळजी घेण्यासाठी वृद्धावस्थेत देखील धावपळ सुरू आहे.

तीस मुला मुलींचं लावलं लग्न :वझर येथील आश्रमात अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करणं, त्यांच्या डोक्यावरून हरवलेल्या आई-वडिलांचं छत्र म्हणून स्वतः आधार होऊन आपल्या पायावर उभं राहण्यासाठी झटणाऱ्या शंकर बाबा पापळकर यांनी आजवर आश्रमातील 30 मुला मुलींचं लग्न लावून त्यांचं समाजात पुनर्वसन केलं आहे. या कार्यात त्यांनी सातत्यानं अमरावतीचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, यांच्याकडून आपल्या आश्रमातील मुलींचं कन्यादान करून घेतलं आहे.

मानसिक विकलांग मुलांची करतात सेवा :वझर येथील आश्रमामध्ये अनाथ, मानसिक दृष्ट्या विकलांग, अंध मुलं देखील आहेत. या मुलांचे दात घासून देण्यापासून त्यांची आंघोळ करून देणं, त्यांना शौचालयाला नेणं आदींसह त्यांच्या स्वच्छतेसाठी स्वतः शंकर बाबा पापळकर काळजी घेतात. शंकर बाबा पापळकर ज्याप्रमाणं मानसिक विकलांग मुलांची सेवा करतात, तसं कार्य करण्याचं धाडस कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीचं होत नाही. त्यांची ही सेवा पाहणारे त्यांच्याबाबत एक आगळावेगळा आदर बाळगतात.

आश्रम परिसरात तयार केले जंगल :गत पंचवीस वर्षांपासून अनाथ, अपंग, मतिमंद मुलांची सेवा करणाऱ्या शंकर बाबा पापळकर यांनी या मुलांमध्ये निसर्गाप्रती आपुलकी निर्माण केली. या मुलांच्या मदतीनं आश्रम परिसरात हिरवेगार जंगल निर्माण केलं आहे. वझरच्या जंगलात साग, आवळा, चिकू, कडूलिंब, तेतू, रक्तचंदन, लवंग, विलायची, सिताफळ अशी झाडं लावण्यात आली आहेत. वनौषधीयुक्त फुलं, फळ विकून या आश्रमातील मुलांचा उदरनिर्वाह करण्याचा शंकरबाबा यांचा प्रयत्न आहे. या आश्रम परिसरात एका झोपडीत शंकर बाबा राहतात. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या हयातीतच आपल्या मृत्यूनंतर आपल्याला दफन करण्यासाठी कबर देखील खोदून ठेवली आहे. या कबरेच्या ठिकाणी 'माझ्या मृत्यूनंतर माझं शरीर या कबरमध्ये माझ्या मतिमंद अनाथ मुलांनी दफन करावे' असं फलकावर लिहून देखील ठेवलं आहे.

मतिमंद मुलांसाठी शंकर बाबांचा लढा :18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतिमंद दृष्टीहीन मुलांना बालगृहात ठेवता येत नाही, असा नियम आहे. अठरा वर्षानंतर अनाथ असणाऱ्या मतिमंद दृष्टीहीन मुलांच्या भविष्याचं काय, असा सवाल शंकर बाबा पापळकर सातत्यानं सरकारकडं विचारत आहेत. या मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारनं विशेष कायदा करावा, या मागणीसाठी शंकरबाबा पापळकर हे लढा देत आहेत.

माझ्या लढ्यासाठी स्वीकारतो आहे पद्मश्री :"खरंतर आजपर्यंत मी जे काही कार्य केलं आहे ते निस्वार्थ भावनेनं केवळ अनाथ, मतिमंद मुलांना न्याय मिळावा, हाच त्यामागं उद्देश आहे. आता देखील अठरा वर्ष पूर्ण केल्यावर अनाथ मतिमंद मुलांना योग्यपणे जगण्याचा अधिकार मिळावा, यासाठी शासनानं कायदा करावा, हीच माझी मागणी आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून माझ्या या लढायला बळकटी येईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनाथ, मतिमंद मुलांचा विचार करून त्यांच्या पुनर्वसनासाठी हा कायदा अमलात आणतील, असा मला विश्वास आहे," असं शंकर बाबा पापळकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणाचा करण्यात आला गौरव ?
  2. मुंबई अग्निशमन दलातील 6 जवानांना राष्‍ट्रपती ‘गुणवत्‍तापूर्ण सेवा पदक’ जाहीर
Last Updated : Jan 26, 2024, 2:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details