मुंबईAmbadas Danve :भाजपा आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 2 जुलै रोजी 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. मात्र आज संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात 5 दिवसांच्या निलंबनाऐवजी 3 दिवसांच्या निलंबनाचा ठराव मांडला. त्यानंतर हा ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आला. त्यामुळं दानवे यांचं निलंबन 5 दिवसांवरून 3 दिवसांवर करण्यात आलं आहे. याचाच अर्थ अंबादास दानवे उद्यापासून सभागृहात उपस्थित राहणार आहेत.
निलंबनावर झाली होती टीका :काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विधान परिषदेमध्ये गदारोळ झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांना सभागृहात शिवीगाळ केली होती. त्यानंतर या मुद्द्यावर भाजपा आक्रमक झाल्यावर सभागृहात ठराव करून अंबादास दानवे यांचं 5 दिवसासाठी निलंबन करण्यात आलं होतं. अंबादास दानवे यांच्या निलंबनावर उद्धव ठाकरे यांनीही आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला केला होता. अंबादास दानवे यांच निलंबन म्हणजे षडयंत्र असून लोकशाहीला दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले होते.
अंबादास दानवे यांनी मागितली माफी : राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. अंबादास दानवे यांच्या निलंबनानंतर कालही विरोधकांनी कामकाजात भाग घेण्यास नकार दिला होता. अंबादास दानवे यांचं निलंबन मागं, घेण्यासाठी विरोधकांकडून सरकारवर दबाव टाकण्यात आला. तसंच या प्रकरणी अंबादास दानवे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत लेखी माफी मागितलीय.
सरकारचा निर्णय मला मान्य :आज सभागृहात भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याबाबत सरकार जो निर्णय घेईल, त्यांना मान्य असेल असं सांगितलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांचं पाच दिवसाचं निलंबन तीन दिवसावर करण्याचा ठराव मांडला. तो बहुमतानं मंजूर झाल्यानंतर अंबादास दानवे यांचे निलंबन तीन दिवसासाठी करण्यात आलं, असं सभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या. अंबादास दानवे आता शुक्रवारपासून सभागृहातील कामकाजात सहभागी होतील.
'हे' वाचलंत का :
- ...तर माझ्यावर हक्कभंग आणा; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना आव्हान - Devendra Fadnavis News
- नवाब भाई आहेत कुठं...? अजित पवारांच्या 'देवगिरी'वर काय घडलं? - Nawab Malik
- मला गोळ्या घातल्या तरी मी कुणाच्या बापाला भीत नाही; अंतरवालीत घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर जरांगे यांची प्रतिक्रिया - Manoj Jarange Patil