पुणे-देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यभर दौरे करताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी गडचिरोली येथे झालेल्या दौऱ्यात जहाल नक्षली ताराक्कांसह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करलीय. देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्याचे आता शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून कौतुक करण्यात आलंय. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, शपथ घेतल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री हेच ॲक्टिव्ह दिसत आहेत. या सरकारमध्ये जर कोणी ॲक्शन मोडमध्ये असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री असून, दुसर कोणीही दिसत नसल्याचं यावेळी सुळे म्हणाल्यात.
सावित्रीबाई फुलेंमुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलंय. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आजचा दिवस उत्साहात साजरा झाला पाहिजे. पवार साहेब मुख्यमंत्री असताना राजकीय मत बाजूला ठेवून सगळे नेते एकत्र आले होते आणि हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून त्या काळापासून उपक्रम सुरू आहेत. आज आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत, त्यामागे ही मोठी ताकद आहे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे, असंही यावेळी सुळे म्हणाल्यात.
कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात पत्र लिहिणार :सुप्रिया सुळे यांना राज्यातील महिला अत्याचारच्या घटनेबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या की, आज मी मुख्यमंत्री यांना एक पत्र लिहिणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात पत्र लिहिणार आहे. एवढं मोठं बहुमत सरकारला मिळालं आहे. दीड महिना झाला, पण जे ॲक्शन मोड अपेक्षित होत ते दिसत नाही. मुख्यमंत्री एकटे ॲक्शन मोडमध्ये दिसतात, बाकी कोणी दिसत नाही, असंही यावेळी सुळे म्हणाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आई आशाताई पवार यांनी दोन्ही पवार एकत्र यावं, असं विधान केलं होतं. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारल असता त्या म्हणाल्या की, मी एक लोकप्रतिनिधी असल्याने मला वैयक्तिक बोलायचं अधिकार नाही. माझ्या कुटुंबात कधीही अंतर नव्हतं, ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं लगेच मी आशा काकी यांना भेटायला गेले. भावना व्यक्त करायच्या एका सशक्त लोकशाहीत प्रत्येकाचं अधिकार आहे, असंही यावेळी सुळे म्हणाल्या.
बीडचा विषय हा राजकीय राहिलेला नाही :बीड प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. यावर सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, बीडचा विषय हा राजकीय राहिलेला नाही, तो माणुसकी विरुद्ध क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे. जर सगळ्याच पक्षातील नेते एकत्र झाले असतील तर त्याला कुठलाही राजकीय रंग कोणीही देऊ नये. माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्र्यावर जेव्हा आरोप झाले, तेव्हा नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा दिलाय. आता या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी याबाबत योग्य निर्णय घ्यावा, तसेच काहीतरी नैतिकता या सरकारमध्ये असावी ही माफक अपेक्षा असल्याचं यावेळी सुळे यांनी सांगितलंय.
सरकारमध्ये एकच ॲक्टिव्ह माणूस, ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सुप्रिया सुळेंकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव - CHIEF MINISTER DEVENDRA FADNAVIS
या सरकारमध्ये जर कोणी ॲक्शन मोडमध्ये असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री असून, दुसर कोणीही दिसत नसल्याचं यावेळी सुळे म्हणाल्यात.
सुप्रिया सुळे (Source- ETV Bharat)
Published : Jan 3, 2025, 7:27 PM IST