पुणे :अभिनेते सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) घरात घुसून हल्ला करण्यात आल्याची घटना मुंबईत घडली आहे. तर दुसरीकडं अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची देखील संशयितांनी रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "या प्रकरणात जो आरोपी सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्या व्यक्तीशी साम्य असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीत काही गोष्टी समोर येतील". पुण्यात मंत्री योगेश कदम यांनी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांच्याशी Exclusive बातचित केली.
काय म्हणाले गृहराज्य मंत्री योगेश कदम ? : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणानंतर पुन्हा एकदा सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे. खासगी सोसायटीबाबत कदम यांना विचारलं असता ते म्हणाले की, "खासगी सोसायटीनं सिक्युरिटीबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. सोसायटीच्या आतमध्ये एखादी व्यक्ती कोणत्याही कामानिमित्त येत असेल, तर ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ती व्यक्ती येत आहे त्याचं व्हेरिफिकेशन झालं आहे, की नाही पाहणे, तसेच तो व्यक्ती आत येताना त्याची तपासणी करण्याची जबाबदारी ही सोसायटीची असते. अता पुन्हा एकदा सरकारच्या माध्यमातून खासगी सोसायटीवाल्यांना आदेश देण्यात येणार आहे. भविष्यात अशा घटना घडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे".