मुंबई : नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान आहे, अशा आशयाचं वादग्रस्त वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं. यावेळी त्यांनी प्रियंका गांधी निवडून कसा आल्या याबाबतही नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. अफजलखान वधाचे पोस्टर हिंदुस्तानमध्ये नाही लावायचे तर मग काय पाकिस्तानमध्ये लावायचे का? असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला. नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता याबाबत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना, काँग्रेसनं भाजपावर आणि नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी नितेश राणे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
वेगळी अपेक्षा काय करणार? : "नितेश राणे यांच्याकडून कोणती वेगळी अपेक्षा करणार. ते सतत वादग्रस्त वक्तव्य करत आलेले आहेत. पण त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना भारताच्या एकात्मतेबद्दल आणि संविधानाबद्दल शपथ घेतली. त्यानंतर ते देशातील एका राज्यातील मतदारांना अतिरेकी म्हणतात. काँग्रेसचे खासदार अतिरेक्यांच्या मतदानामुळे निवडून येतात असं म्हणतात. हे स्वतःला राष्ट्र प्रथम म्हणते त्या भाजपाला कसे चालते?," असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. "ज्या राज्यात बेरोजगारी, महागाई, अत्याचार, खून आणि गुन्हेगारी वाढत आहे. तर दुसरीकडं भाजपा हे धर्मांध आणि द्वेष यांचं विष पसरवत आहे. ज्या नितेश राणेंनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. भाजपाचे नेते स्वतःला राष्ट्रभक्त म्हणतात. ते नितेश राणेंना मंत्रिमंडळात का ठेवतात?," अशी टीका अतुल लोंढे यांनी भाजपा आणि नितेश राणे यांच्यावर केली आहे.