हैदराबाद Nilesh Lanke Oath In English : अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत इंग्रजीचा मुद्दा चांगलाच गाजला. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला इंग्रजी येत नाही, अशी खिल्ली महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी उडवली. त्यावर लोकसभा निवडणुकीत चांगलंच रणकंदन झालं. त्यानंतर निवडून आल्यावर निलेश लंके यांनी 'पवार इज द पावर' म्हणत सुजय विखेंचं नाव न घेता टोला लगावला. आता तर निलेश लंकेंनी खासदार झाल्यावर चक्क इंग्रजीतून शपथ घेत सुजय विखे पाटलांनी उडवलेल्या खिल्लीचा वचपा काढला. त्यामुळे आता सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगणार असल्याचं दिसून येत आहे.
निलेश लंकेंनी इंग्रजीतून घेतली खासदारकीची शपथ :लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला इंग्रजी येत नसल्याचा मुद्दा महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी उचलला. सुजय विखे पाटील यांनी उडवलेल्या खिल्लीचा जोरदार घाव महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना झाला. त्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात "सगळ्यांचा नाद करा, मात्र शरद पवार यांचा नाद करू नका, इथं भले भले घरी बसवले" अशी टीका त्यांनी सुजय विखे यांचं नाव न घेता केली. आज लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. या सोहळ्यात निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथ घेतली. इंग्रजी येत नसल्यानं सुजय विखे पाटील यांनी खिल्ली उडवल्याचं निलेश लंकेच्या जिव्हारी लागलं होतं. त्यामुळे निलेश लंकेंनी चक्क इंग्रजीतून शपथ घेत हा वचपा काढल्याची चर्चा आता करण्यात येत आहे.