ठाणे/अमरावती :एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या गुप्तचर यंत्रणेच्या पथकानं महाराष्ट्रासह देशभरातील पाच राज्यांमध्ये कारवाई केली आहे. एनआयएच्या पथकानं भिवंडी आणि अमरावती कारवाई करून दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
एनआयएची भिवंडीसह अमरावतीत कारवाई, दोन संशयित तरुणांची चौकशी सुरू
एनआयएकडून भिवंडी आणि अमरावतीमधील एकूण दोन संशयित तरुणांची चौकशी सुरू आहे. या दोन तरुणांचे दहशतवाद्यांशी कनेक्शन आहे का, याबाबत एनआयएकडून तपास सुरू आहे.
Published : 5 hours ago
|Updated : 4 hours ago
एनआयएच्या पथकानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ठाणे जिल्हातील भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायतच्या हद्दीतून छापा मारला. यावेळी सापळा रचत संशयित तरुणाला आज पहाटेच्या सुमारास पथकानं ताब्यात घेतलं आहे. ककामरान अन्सारी असे एनआयएच्या पथकानं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. काही महिन्यापूर्वी भिवंडी तालुक्यातील पडघा - बोरिवली गावातून 'आयसिस' दहशतवादी संघटनेच्या 6 ते 7 जणांना अटक केली होती.
- दुसरीकडं एनआयए पथकाकडून अमरावतीत एका युवकाची पाकिस्तानशी संबंध असल्याच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. एनआयएचं पथक शुक्रवारी पहाटेच अमरावतीत दाखल झालं.
पहाटे साडेतीन वाजता युवकाला अटक-पाकिस्तानशी संबंध असणाऱ्या देशभरात विविध ठिकाणी एनआयएच्या पथकानं धाडसत्र राबवून 24 ते 25 जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. अमरावती शहरातील छाया नगर परिसरात राहणाऱ्या एका युवकालादेखील पाकिस्तानसोबत संबंध असल्याच्या माहितीवरून ताब्यात घेण्यात आलं. एनआयएचं पथक आणि राजापेठ पोलिसांच्या वतीनं संयुक्त कारवाईदरम्यान या युवकाला पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेण्यात आलं. छाया नगर परिसरातील 35 वर्ष युवक गत काही दिवसांपासून पाकिस्तानमधील काही संघटनांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होता. या युवकाचा नेमका कोणत्या संघटनांशी संपर्क होता? या संदर्भात एनआयएचं पथक चौकशी करत आहे.
2022 मध्ये आलं होतं एनआयएचं पथक-यापूर्वी अमरावती शहरात एनआयएचं पथक 2022 मध्ये उमेश कोल्हेंच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आलं होतं. आता पुन्हा एकदा एनआयएचं पथक अमरावतीत दाखल झालं. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाची बराच वेळेपासून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात नेमकं काय तथ्य आहे? हे लवकरच स्पष्ट होईल, असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं.