अनिकेत जोशी यांची प्रतिक्रिया मुंबईLok Sabha Elections :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवार म्हणून त्यांनी स्वतःचं नाव समाज माध्यमांवर जाहीर केलंय. त्या पाठोपाठ शिरूर मतदार संघाचे संभाव्य उमेदवार म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नसताना या दोघांनी प्रचार सुरू केला आहे.
अनौपचारिकपणे प्रचाराचा शुभारंभ :बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये संभाव्य उमेदवार म्हणून खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी प्रचाराचा शुभारंभ अनौपचारिकपणे सुरू केला आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र महायुतीचे उमेदवार अजून का ठरत नाहीत? असा प्रश्न अनेकांना प्रश्न पडलाय. आमच्या संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली असेल, तर त्यात काही चुकीचं नाहीये, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दिली आहे.
पवार स्टाईलचं राजकारण :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे तसंच अमोल कोल्हे या दोन खासदारांच्या निवडणुकीची तयारी पूर्ण केल्याचं सध्या दिसत आहे. त्यामुळं बारामती, शिरूर मतदारसंघ शरद पवार यांच्याकडं जाणार यात शंका नाही. महाविकास आघाडीचं अद्याप जागावाटप पूर्ण झालेलं नाही. प्रत्यक्षात कोणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही या दोघांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. त्यामुळं आता सोशल मीडियावर तुतारी वाजवायला सुरवात केलीय, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी म्हणाले.
सुनेत्रा पवार यांना बारामतीची उमेदवारी :बारामतीत सुप्रिया सुळे यांना आगोदरच प्रचाराला सुरुवात करावी लागणार आहे. कारण अजित अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं सुप्रिया सुळे यांना जोरदार प्रचार करणं भागच आहे, असं जोशी यांनी म्हटलंय.
शरद पवार रिंगणात :महायुती सरकारनं अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामतीमध्ये महारोजगार मेळावा आयोजित केलाय. त्याच्या मंचावर देखील सुप्रिया सुळे, शरद पवार हजर होते. त्यामुळं महायुतीच्या उमेदवारांना रोजगार मेळाव्यातून मतदानाचा लाभ मिळण्याची शक्यता होती. म्हणूनच शरद पवार रिंगणात उतरले आहेत. कोणत्याही सरकारी कार्यक्रमाला स्थानिक खासदारांना निमंत्रित करणं सरकारचं कर्तव्य आहे. त्यामुळं खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी नमो रोजगार मेळाव्याला हजेरी लावली आहे. काहींना त्यांची उपस्थिती आश्चर्यकारक वाटली असेल, पण शरद पवारांची आक्रमक राजकारणाची शैली आपण पाहिली आहे. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळं उमेदवार जाहीर होण्याआधीच पवारांनी प्रचाराची सुरवात केल्याचं दिसून येत आहे, असं जोशी म्हणाले.
यंदा बारामतीतही लढाई अटीतटीची :बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, आता अजित पवारांनी बंड केल्यानंतर सुप्रिया सुळे यांची ताकद कमी झाली आहे. सुप्रिया सुळे यांना मतदारसंघ राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत. दुसरीकडं शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील यांच्यासारखा तगडा उमेदवार असल्यानं अमोल कोल्हे यांनाही प्रचाराशिवाय पर्याय नाही. त्यातच पक्षाला जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी तुतारी हे पक्षाला नवं चिन्ह मिळालं आहे. त्यामुळंच उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच या दोघांनी चिन्हावर प्रचार सुरू केल्याचंही जोशी म्हणाले.
हे वाचा -
- 'नमो रोजगार मेळाव्या'निमित्त काका-पुतण्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकाच मंचावर
- 'तीन दिवसात माफी मागा'; नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस, काय आहे प्रकरण?
- लोकसभा निवडणुकीपूर्वी गौतमनं घेतला 'गंभीर' निर्णय; सोशल मीडियावर केली घोषणा