पुणे Supriya Sule On Nitish Kumar : बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून, महागठबंधनचं सरकार कोसळलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत एनडीएसोबत सरकार स्थापन केलंय. यावेळी त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांनी देखील शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी ‘इंडिया’ आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, त्यांनी भाजपाचं कमळ हातात घेत 'इंडिया' आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
सुप्रिया सुळेंची टीका : नितीश कुमार यांनी रविवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 'इंडिया' आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे नितीशकुमार भाजपासोबत गेल्यानं इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. तसंच केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : 'इंडिया' आघाडीत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत आहे. ही आमची वैचारिक लढाई आहे. दिल्लीत दडपशाही सुरू आहे. सत्ताधारी व्यवस्थेचा गैरवापर करून विरोधकांचे सरकार पाडत आहेत. त्यामुळं आम्ही या घटनेचा निषेध करतो. पण आमचा या दडपशाहीविरुद्ध लढा सुरूच राहील, असं सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. नितीश कुमारांनी भाजपा सोडल्यानंतर भाजपाचे दार त्यांच्यासाठी कायमचे बंद झाले, असं गृहमंत्री अमित शाहा म्हणाले होते. मात्र, भाजपानं आता राजकारणातील नैतिकता गमावली आहे. महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत हेच वाक्य मी ऐकलंय. त्यामुळं हा भाजपाचा स्वभाव असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.