मुंबईJayant Patil Criticized State Govt :महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधक वारंवार महायुती सरकारला टार्गेट करत असतात. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात वाढलेल्या गुन्हेगारीच्या प्रमाणामुळे संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच काल अल्पवयीन मुलांचे हॉटेलात ड्रग्ज सेवन करणारे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त करत सरकारच्या नाकर्तेपणामुळे 'विद्येचं माहेरघर’ अशी ओळख असणाऱ्या पुण्याची ‘ड्रग्ज आणि पब्जचे माहेरघर’ झाल्याचा हल्लाबोल केला.
ड्रग्ज घेतानाचे व्हिडिओ व्हायरल :प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केली आहे. ते म्हणतात की, गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेलमध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खबऱ्यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे असं ते म्हणाले.
याला सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत :पुण्यातील पॉर्शे कार अपघातातील प्रकरणात तर मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचं रक्त बदलवण्यात आलं. व्यवस्था पैशाच्या जोरावर कशाप्रकारे वाकविली जाते याचं उदाहरण समोर आलं आहे. लोकांच्या नजरेसमोर जे कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत अशीही शंका त्यांनी व्यक्त केली. विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्याची ओळख 'ड्रग्ज व पब्जचे माहेरघर' झालीय. याला सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यामुळे पुणे शहराची आठवण होते. तीच मूळ ओळख पुसली जाऊन पुणे शहर आज सत्तेतील भाजपा-शिंदे गटाच्या सरकारमुळे बदनाम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी :केंद्रातील नवीन सरकारचं पहिलं अधिवेशन दिल्लीत आजपासून सुरू झालं आहे. नवनिर्वाचित खासदारांची हंगामी अध्यक्षांकडून खासदार पदाची शपथ घेतली आहे. देशातील सर्वच पक्षाचे नवनिर्वाचित खासदार कालपासूनच दिल्लीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिका क्षेत्रात 34 गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर, या गावांच्या मिळकत करावरून सरकारचं ट्विटच्या माध्यमातून लक्ष वेधलं आहे.
पुणे महापालिका हद्दीत 34 गावांचा समावेश :पुणे महानगरपालिका क्षेत्रात 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावातील मिळकत करांतील त्रुटीविषयी वारंवार नागरिकांकडून महापालिकेकडे वेगवेगळ्या माध्यमातून समस्या मांडल्या जात आहेत. महापालिकेकडून त्यासंदर्भात कोणतीही दखल घेतली नाही. उलट समाविष्ट झालेल्या 34 गावांचा ग्रामपंचायत कर आकारणीपेक्षा 9 ते 10 टक्के कर आकारण्यात आलाय. याविषयी अनेकवेळा पाठपुरावा करून देखील महापालिकेकडून योग्य ती कारवाई केली जात नाही. उलट कर थकवल्यामुळे महापालिकेकडून कारवाई केली जात असल्याचं नागरिक सांगत आहेत. हे अतिशय चुकीचं असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. कर आकारणीतील त्रुटी दूर करण्यापूर्वी अशा प्रकारे कारवाई करणे अन्यायकारक, जनतेची लूट करणाऱ्यात मोडत आहे. महापालिका आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन ग्रामस्थांचं म्हणणे ऐकून घेऊन तोडगा काढणं गरजेचं होतं; मात्र ते दिसत नाही. या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून विषय मार्गी लावावा अशा प्रकारची विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
हेही वाचा:
- नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरच्या दोन शिक्षकांसह चौघांवर गुन्हा, एसआयटी चौकशी होणार - NEET Paper Leak Case
- "ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलीस मास्टर माईंडपर्यंत पोहचणार नाहीत,कारण..."- आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप - Pune Drugs News
- नियमबाह्य काम करणाऱ्या 'त्या' अधिकाऱ्यांची यादी तयार करणार, अनिल देशमुख यांचा इशारा - ANIL DESHMUKH News