मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार असल्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मी डॉक्टर आणि पोलिसांशी बोललो. दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी उत्तर प्रदेशचा तर दुसरा आरोपी हरियाणाचा आहे. तिसरा आरोपी फरार आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांना कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उर्वरित संशयितांनाही लवकरच पकडण्यात येईल, असा मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे " मुंबई पोलीस तिसऱ्या आरोपीला लवकरच अटक करतील, असा मला विश्वास आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल."
आरोपींवर कठोर कारवाईची मागणी-उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह लीलावती हॉस्पिटलला शनिवारी रात्री भेट दिली. यावेळी त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनीदेखील सिद्दीकींच्या कुटुंबीयांची रुग्णालयात भेट घेतली. "बाबा सिद्दीकींच्या हत्येचा योग्य तपास झाला पाहिजे. मी आताच लिलावती रुग्णालयातून आलो. त्याच्या कुटुंबीयांना भेटलो. हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे," अशी रामदास आठवले यांनी मागणी केली.
गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त-मुंबईचे अतिरिक्त सीपी परमजीत सिंग दहिया यांनी दोन संशयितांना अटक केल्याच्या माहितीला दुजोरा दिला. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, "निर्मल नगरमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. गोळी लागल्यावर बाबा सिद्दिकींना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेले 9.9 मिमी पिस्तूल मुंबई पोलिसांनी जप्त केले. मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे."
हेही वाचा-
- बाबा सिद्दीकींच्या हत्येमुळं राजकारणात खळबळ; कोण काय म्हणालं? वाचा सविस्तर
- अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळीबारात हत्या; तीन हल्लेखोरांनी घातल्या गोळ्या