मुंबई :बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एका मोस्ट वाँटेड आरोपीला बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. सलमान खान हत्येचा कट रचल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मोस्ट वाँटेड सुखा याला हरियणातील पानिपत इथून पकडल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनं वृत्तसंस्थेला दिली आहे.
मोस्ट वाँटेड सुखाला पानिपत इथून अटक :सलमान खान याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपी सुखा हा मोस्ट वाँटेड आरोपी आहे. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई पोलीस आरोपी सुखाच्या मागावर होते. मात्र तो पोलिसांना आढळून येत नव्हता. अखेर नवी मुंबई पोलिसांनी मोस्ट वाँटेड सुखा याला हरियाणातील पानिपत इथून पकडण्यात यश आलं. आरोपी सुखाला मुंबईत आणण्यात आलं असून त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केलं जाईल, असंही या पोलीस अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला बोलताना सांगितलं.