छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - आम्ही मैदानात नव्हतो, समाजाला मोकळीक होती, मराठा मतांवरच विजय मिळाला आहे. मराठा आमदारांची संख्या वाढली आहे, हे काही लोकांनी लक्षात घ्यावं असा टोला छगन भुजबळ यांना जरांगे पाटील यांनी लगावलाय.
जरांगे फॅक्टर फेल कसा? - विधानसभा निवडणुकीत ज्यांचा विजय झाला त्याचं कोणी श्रेय घ्यायचं ते त्यांनी ठरवावं. जरांगे फॅक्टर फेल झाला अशी टीका होत आहे. मात्र, आम्ही मैदानात नव्हतोच. त्यामुळे आम्हाला कोण आले आणि कोण नाही त्याचं घेणंदेणं नाही. जे आले ते सगळे मराठ्यांच्या जीवावर आले. जरांगे फेल यावर ते उद्विग्नपणे म्हणाले, मराठा कळायला तुमची सगळी हयात जाईल. मात्र तुम्हाला जरांगे फॅक्टर कळायचा नाही, आम्ही मैदानात नाही उगाच गप्पा ठोकतात. गोड बोलून मराठ्यांचे मत मिळवले, त्यांच्याच ताकदीवर तुम्ही निवडून आलात. आम्ही उगाच दुसऱ्यांच्या गर्दीत जात नाही. आम्हाला देणंघेणं नाही. मराठा पुन्हा मैदानात आहे. आरक्षण द्यावे लागेल. आमच्या लेकरांसाठी आम्ही पुन्हा तयार आहोत. आरक्षण द्या नाहीतर आम्ही पुन्हा छातीवर बसणार. नवीन सरकार स्थापन होताच आम्ही आमच्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार. आम्ही सामूहिक उपोषणाला सुरुवात करणार असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय.
आता आरक्षण द्या - एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नसल्याने लढलो नाही. बाजूला गेलो, सरकार कोणाचे आले तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार, लढावं लागणार हे माहीत होतं. त्यामुळे आम्ही आमची तयारी सुरू केली. कोणी मस्तीत येण्याचं काम करू नका. आम्हाला छेडू नका, सरकार म्हणून पालकत्व तुमच्याकडे आहे. लोकशाही मार्गाने आम्ही आमची मागणी करणार, सत्तेत आहे म्हणून गुंडगिरी, दादागिरी करणार असली भाषा आमच्यासमोर टिकणार नाही. बेइमानी करायची नाही कोणी आले तरी सुटका नाही. समाजाला संकटात सोडायचं नाही म्हणून माघार घेतली. अडीअडचणी येणाऱ्या व्यक्तीला मतदान करा असं सांगून समाज मोकळा सोडला होता. मराठा समाजाच्या मतांशिवय निवडून येणे कोणासाठीही शक्य नाही आणि सत्ता स्थापन करू शकत नाही. आम्ही दिलं आता तुम्ही समाजाला द्या. आमचं सरकार आलं म्हणून आता काही सांगू नका.
समाजावर बंधन नव्हते, म्हणून तुम्हाला मतदान - मी समाजाला बंधन मुक्त केलं, मैदानात असतो तर धुराळा उडवला असता. मनगटात दम आहे, जो मैदानात नाही त्याला काहीही बोलता. कसले अभ्यासक आहेत, एक महिना थांबा मराठा काय आहेत ते कळेल. सभा घेतल्या एकाच्या आणि निवडून आले दुसरेच. अशी ताकद पाहिजे की सभा घेतली की विरोधातला पडलाच पाहिजे अशी टीका जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली. मराठ्यांचे 204 निवडून आलेत, राज्यात मराठे बाप ठरले. मुलगा म्हणून मी आरक्षणासाठी लढणार आमच्या गरिबांना ते गरजेचे आहे. मराठा समाज सर्व पक्षांमध्ये विखुरला आहे. मात्र आंदोलनात सगळे एका बाजूला दिसतील. आता जिंकलेल्यानी आणि पडलेल्यानी समाजाच्या मदतीला जायचं असं आवाहन त्यांनी मराठा आमदारांना आणि कार्यकर्त्यांना केलं.
हेही वाचा...
मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेण्याचं कारण काय? फायदा कुणाला मविआ की महायुतीला?