नांदेड : उच्च शिक्षण घेऊनही सरकारी किंवा खासगी नोकरीची अपेक्षा न करता व्यवसायामधूनदेखील प्रचंड यश मिळविता येते. हे नांदेडमधील उच्च शिक्षित तरुणानं दाखवून दिलं आहे. आशिष एडके असं पोल्ट्री फार्मिंगच्या व्यवसायात भरारी घेतलेल्या 33 वर्षीय तरुणाचं नाव आहे.
आशिष एडके या तरुणानंतीन वर्षे पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पीएसआय पदासाठी आवश्यक असलेली एमपीएससीची प्रीलिम्स परीक्षा देखील उत्तीर्ण केली. मात्र, तरीही मुख्य परीक्षेत यश मिळवता आलं नाही. त्यामुळं हताश झालेल्या तरुणानं थेट गाव गाठलं. स्टार्टअप म्हणून पोल्ट्री फार्मच्या व्यवसायाकडं वळण्याचा निर्णय घेतला. त्याचा हाच निर्णय आज अधिक फायद्याचा ठरताना दिसत आहे. आज तो याच व्यवसायाच्या माध्यमातून दीड महिन्याला पाच लाखांचा निव्वळ नफा कमवतोय.
पोल्ट्री फार्मिंगच्या व्यवसायात नांदेडच्या युवा उद्योजकाची भरारी (ETV Bharat Reporter)
अधिकारी होण्याचं होतं स्वप्न : तो सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत नांदेड शहरातील विजयनगर भागात वास्तव्यास आहे. आशिष एडके याचे समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र या दोन विषयात पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचं स्वप्न त्यानं उराशी बाळगलं. 2015 मध्ये पुणे येथे जाऊन त्यानं स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दोन ते चार मार्कानं तो यशाच्याजवळ जात होता. मात्र, त्याला हे यश सतत हुलकावणी देत होतं. त्यामुळं वेळ वाया न घालवता तो नांदेडला परतला.
प्राध्यापक पदाची नोकरी नाकारली : आशिषला प्राध्यापक पदाची नोकरी मिळत होती. मात्र, नोकरी न करता त्यानं स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा संकल्प केला. पण त्यातच कोरोना आजारानं डोकंवर काढलं. त्यामुळं पुन्हा दीड-दोन वर्षे त्याला घरीच बसावं लागलं. कोरोना काळात आशिषनं मोबाईलवर वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती घेतली. त्यात कमी कालावधीत अधिक पैसे देणारा व्यवसाय म्हणजे 'पोल्ट्री फार्मिंग' असं आशिषच्या लक्षात आलं. त्यामुळं त्यानं हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पोल्ट्री फार्मिंगसाठी घरचे काही पैसे आणि बँकेचे लोन घेऊन नांदेडजवळ असलेल्या निळा शिवारातील शेतात 2023 मध्ये इसी पोल्ट्री फार्मिंगचे बंदिस्त शेड उभारले. या सर्व कामासाठी सुरुवातीला सर्व एकूण 80 लाखांपर्यंत खर्च आला.
- एक एकर शेतीत पोल्ट्री फार्म : आशिषनं एका एकर शेतीवर दहा हजार स्क्वेअर फुटाचे इसी शेड उभारले. या शेडमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. हिवाळ्यात कोंबडीच्या पिल्लांना उब देण्यासाठी हिटर, वेगवेगळे लाईट्स, अन्न- पाण्यासाठी स्वयंचलित यंत्र, उन्हाळ्यासाठी कुलिंग, विजेसाठी इन्व्हर्टर आदी सर्व गोष्टींची व्यवस्था यात करून ठेवली आहे.
15 हजार पिल्लांचा एक प्लॉट : या पोल्ट्री फार्ममध्ये 15 हजार कोंबडीच्या पिल्लांचा एकावेळी प्लॉट घेण्याची व्यवस्था करण्यात आलीय. एका वर्षात असे सहा प्लॉट काढता येतात. हा प्लॉट विक्रीसाठी तयार होण्यास जवळपास 45 दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर पूर्ण वाढ झाल्यावर एकाचवेळी या प्लॉटची कंपनीला विक्री होते. संबंधित कंपनी प्लॉटवर येऊन तयार झालेला माल खरेदी करून जागेवरुन घेऊन जाते.
- दीड महिन्यात पाच लाखांचा नफा : पोल्ट्री फार्मसाठी लागणारी पिल्लं आणि खाद्य, कंपनीमार्फत पुरवले जाते. 45 दिवसांच्या प्लॉटला तब्बल 20 लाखांचे खाद्य लागते. तर चार लाखांचे पिल्ले लागतात. तर पिल्लं आणि खाद्याचा खर्च वजा जाता या व्यवसायातून पाच लाखापर्यंत नफा मिळतो.
- नोकरीच्या मागे पळू नये : "युवकांना स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळत नसेल, तर शेती असलेल्या तरुणांनी शेतीपूरक व्यवसायाकडं वळावं. त्यामध्ये कमी वेळेत अधिक पैसे देणाऱ्या व्यवसायाची निवड करावी. नोकरीच्या मागे पळण्यापेक्षा व्यवसाय उभारून रोजगार निर्माण करणारे हात बनावे", असं आवाहन आशिष एडके यानं युवकांना केलंय.
हेही वाचा -
- निराशेतून उभारी घेत शेतकरी महिला बनली 'ड्रोन पायलट'; 'ड्रोन दीदी'ची थक्क करणारी यशोगाथा - Drone Pilot Woman
- मिश्र लागवडीतून लाखोंचं उत्पन्न; बीडमध्ये खजूर, ड्रॅगन फ्रूट, सफरचंद फळांची लागवड - Mixed Farming Of Fruits In Beed
- अपघातात पाय गमावले; शिवणकाम आणि शिकवणी घेऊन घडवलं करिअर, जाणून घ्या सुनिता कुरकुटे यांची यशोगाथा - Sunita Kurkute