नाशिक : कॅनडाच्या टोरंटो शहरामध्ये 24 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास नवीन टेस्ला कारचा अपघातात स्फोट होऊन चार तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातात नाशिकच्या इंदिरानगरमधील दिग्विजय राजेंद्र औसरकर (वय 30) या तरुणाचा मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिग्विजयचे वडील आणि बहीण नाशिकहुन कॅनडाला गेल्यानंतर डीएनएद्वारे दिग्विजयची ओळख पटवण्यात कॅनडा पोलिसांना यश आलं आहे. दिग्विजय हा मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून एका मोठ्या कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत होता.
दिग्विजयनं अमेरिकेतून केलं मेकॅनिकल इंजिनियर :नाशिकच्या दिग्विजय राजेंद्र औसरकर यानं अमेरिकेतून मेकॅनिकल इंजिनियरचं शिक्षण पूर्ण केलं. दिग्विजय हा अतिशय हुशार असल्यानं त्याला तेथील विद्यापीठानं ब्रँड अँबेसिडर केलं. दोन वर्षापूर्वीच त्याला कॅनडा इथं एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर नोकरी मिळाली. त्यामुळे नोकरीनिमित्त तो कॅनडाला स्थायिक होता. पंधरा दिवसापूर्वीच त्याची आई-वडील हे त्याला भेटून भारतात नाशिक इथं परतले. मात्र 24 ऑक्टोबरला झलक पटेल या त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्यानं गुजरातचे केता गोहली, निल गोहली हे भाऊ बहिणीसह चौघंजण वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री टोरंटो शहरात एकत्र जमले. त्यांच्या एका मित्रानं नवीनच टेस्ला कार खरेदी केल्यामुळे वाढदिवस सेलिब्रेशन झाल्यानंतर हे चौघंजण टेस्ट ड्राईव्हला बाहेर पडले. यावेळी अचानकपणे एका गतिरोधकावरुन कार उलटली आणि रस्त्यालगत असलेल्या लोखंडी गल्डरवर जाऊन आदळली. याच क्षणी कारनं पेट घेत काही मिनिटातच मोठा स्फोट झाला. या अपघातात सुदैवानं बर्थडे गर्ल झलकचे प्राण वाचले. मात्र चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिग्विजय हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. या दुर्घटनेमुळे औसरकर कुटुंबाला दिवाळीत मोठा आघात झाला आहे.