नाशिक : शहरातीलसाडगावमध्ये राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली होती. भाऊबीजेच्या दिवशी ही घटना घडली होती. या घटनेची नाशिक पोलिसांनी उकल केली आहे. नराधम भावाने जमिनीच्या वादातून सख्ख्या बहिणीसह मेहुण्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. तर संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली.
काय आहे घटना? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साडगावामध्ये रामू पारधी (वय 70) चंद्रभागा पारधी (वय 65) हे छोट्या घरात राहात होते. त्यांची याच परिसरात कोरडवाहू शेतजमीन आहे. केवळ ते पावसाळ्यात पीक घेत होते. एरवी मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. भाऊबीजेच्या दिवशी चंद्रभागा यांचा सख्खा भाऊ सोमनाथ बेंडकोळी हा घरी आला होता. त्यावेळी जमिनीच्या वादातून त्यांच्यात वाद झाला होता. या वादातून सोमनाथ याने रागाच्या भरात धारदार शस्त्रानं बहिणीसह मेहुण्यावर वार करून त्यांची हत्या केली.
प्रतिक्रिया देताना अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर (ETV Bharat Reporter)
मृतदेह तीन दिवस घरात पडून होते: रामू पारधी आणि चंद्रभागा पारधी यांचे मृतदेह तीन दिवस घरात पडून होते. भाऊबीजेच्या दिवशी (3 ऑक्टोबर) रोजी भाऊ सोमनाथ याने त्यांचा खून करून बाहेरून दरवाजा लावून तो फरार झाला होता. तीन दिवसापासून दाम्पत्य घरी दिसत नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या लोकांनी घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती, पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला असता पारधी दाम्पत्य मृत अवस्थेत आढळून आलं.
असा लागला तपास : पोलिसाना रामू पारधी आणि चंद्रभागा पारधी यांच्या मृत्यूबाबत संशय होता. त्यांनी शवविच्छेदनाचा अहवाल येण्याची प्रतीक्षा केली. डोक्यात घाव बसल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी सोमनाथ बेंडकोळी याच्यावर नजर ठेवली होती. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं त्याला ताब्यात घेतलं. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनं जमिनीच्या वादातून बहीण आणि मेहुण्याचा खून केल्याची कबुली दिली.
हेही वाचा -
- प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे षडयंत्र असल्याचा पूनम महाजन यांचा दावा, कोणावर निशाणा?
- माथेफिरुनं पायाला स्पर्श करुन अगोदर घेतले आशीर्वाद, मग गोळीबार करुन काका पुतण्याची हत्या ; राजधानी हादरली
- अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या 9 साथीदारांनी केली प्रियकराची हत्या; प्रेयसीसह एका मारेकऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या