मालेगाव:मालेगावमध्ये गोळीबाराच्या घटना सुरूच आहेत. मालेगाव पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं आहे. एमआयएमच्या माजी महापौरांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं रविवारी रात्री गोळीबार केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. एक हातावर, एक पायावर आणि एक गोळी छातीला लागली आहे. या घटनेनंतर मालेगावमध्ये तणावाचं वातावरण आहे. शहरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अब्दुल मलिक यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू-घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मालेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आलं आहे. गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.