नाशिक Nashik Fraud News : सीबिल स्कोअर, जामीनदारांशिवाय पाच लाखांचं कर्ज अत्यंत कमी व्याजदरात देण्याचं आमिष दाखवत नाशिकमध्ये 'हाक मराठी अर्बन निधी' बँकेच्या संचालक मंडळांनी 204 गुंतवणूकदारांची तब्बल 34 लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत आर्थिक फसवणुकी अंतर्गत शहर आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं एका संशयिताला अटक केलीय.
नेमकं प्रकरण काय? :नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्यात जवळील संकुलातील पहिल्या मजल्यावर 'हाक अर्बन निधी' नावानं कथित बँक सुरू केली होती. मोबाईलवर 45 दिवसांत कमी व्याजदरात पाच लाख रुपयापर्यंत कर्ज मंजूर करण्याबाबतची जाहिरात पाठवून गुंतवणूकदारांना आमिष दाखवलं. सुमारे 204 गुंतवणूकदारांकडून ऑनलाईन आणि रोख पद्धतीनं प्रत्येकी 17 हजार 500 घेऊन कर्ज मंजूर करण्याचं आश्वासन दिलं. मात्र कुठल्याही प्रकारचं कर्ज मंजूर न करत सुमारे 34 लाख 16 हजार रुपयांचा अपहार केल्याचं उघड झालंय. याबाबत नाशिक आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला संशयित योगेश गुलाब पाटील याला अटक करण्यात आलीय.
- संशयिताला पोलीस कोठडी : संशयित योगेश पाटील यास आर्थिक गुन्हे शाखेनं नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयापुढं हजर केलं असता न्यायालयानं त्यास गुरुवारपर्यंत 13 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयिताकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांची विविध पथके तपासासाठी पाठवण्यात आलीयत.