छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Hingoli Earthquake : मराठवाड्यात आज सकाळी 7 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यात आढळून आला आहे. हिंगोली येथील वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा येथं दुसऱ्यांदा 4.5 रिस्टर स्केल इतका भूकंपाचा धक्का नोंदवला गेला. याच ठिकाणी 'नासा'तर्फे प्रयोगशाळा उभारण्याची तयारी आहे. या भूकंपामुळं या प्रकल्प अडचणीत येणार आहे. गेल्या चार वर्षांमध्ये आजपर्यंत 25 धक्के याच भागात बसले आहेत. या ठिकाणी भूगर्भाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचं मत भूगर्भ आणि हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केलं.
हिंगोली पुन्हा केंद्रबिंदू : मराठवाड्यात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास भूकंपाचा धक्का अनुभवायला मिळाला. या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली असलं तरी त्याची तीव्रता मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. हिंगोली येथील वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा याठिकाणी जमिनीच्या खाली 10 किलोमीटर 4.5 इतकी तीव्रता असलेला भूकंप झाला. कधीही भूकंप न झालेल्या हिंगोली जिल्ह्यात 27 फेब्रुवारी 2020 पासून ते आज पर्यंत 25 धक्के बसले आहेत. त्यांची तीव्रता हळूहळू वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कमीत कमी 1.5 रिस्टर स्केल ते जास्तीत जास्त 4.5 रिस्टर स्केल इतकी तीव्रता आजपर्यंत नोंदवली गेली. हिंगोली येथील वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे या धक्क्याचे केंद्र असल्याचं दिसून आलं. या आधी 21 मार्च 2024 रोजी याच ठिकाणी 4.5 रिस्टर स्केल या तीव्रतेचा धक्का बसला. पुन्हा याच ठिकाणी तितक्याच तीव्रतेचा धक्का पुन्हा आल्यानं ही चिंतेची बाब असल्याचं मत अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केलं.