नंदुरबार flood in the Borvan river: हवामान विभागानं काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हवामान विभागाचा हा इशारा खरा ठरला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. तर तळोदा तालुक्यातील बोरवण गावातील नदीला पूर आल्यानं गावाचा संपर्क तुटला आहे. यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अनेक महिन्यांपासून पुलाचे काम मंजूर झाले. परंतु कामाला सुरुवात झाली नाही.
गावाचा संपर्क तुटल्यानं विद्यार्थी, महिला आणि वयोवृद्धांना जीवघेणा प्रवास:गेल्या काही दिवसांपासून वरुणराजानं पाठ फिरवली होती. मात्र, शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. तळोदा तालुक्यातील बोरवाण गावातील नदीला पूल नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या गावाला पावसाळ्यात पर्याय रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. गरोदर महिला, विद्यार्थी आणि वयोवृद्धांना जीवघेणा संघर्ष करावा लागत आहेत. या जीवघेण्या प्रवासामुळे पुराच्या पाण्यातून अनेकांना आपला जीवदेखील गमावा लागू शकतो.