महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोवाल पाडवी काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्यात यशस्वी, हिना गावित पराभूत - Lok Sabha Election Result 2024

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या हिना गावित यांचा पराभव केला आहे. पाडवी यांनी गावित यांचा 1 लाख 13 हजार 769 मतांनी पराभव केला आहे.

Goval Padavi
गोवल पाडवी (ETV BHARAT Mharashtra)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 7:12 PM IST

नंदुरबारLok Sabha Election Result 2024 : नंदुरबार जिल्हा सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यंदा काँग्रेसनं हा गड राखला असून काँग्रेसचे के. सी. पडवी यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार डॉ. हिना गावित यांचा पराभव केलाय. काँग्रेसचे के.सी. पाडवी यांचे पुत्र ॲड. गोवाल पाडवी विरुद्ध डॉ. हिना गावित यांच्यात थेट लढत झाली. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत भाजपानं नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला होता. यंदाही या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली होती. त्यामुळे या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा काँग्रेसला झाला आहे.

वडिलांच्या पराभवाचा घेतला बदला : नंदुरबार जिल्ह्याची आदिवासीबहुल भाग म्हणून ओळख आहे. एकेकाळी हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. पण 2014 मध्ये इथं सत्तांतर झालं. भाजपाच्या डॉ. हिना गावित यांचा विजय झाला. त्यानंतर 2019 मध्ये त्यांचा पुन्हा विजय झाला. तर या लोकसभा निवडणुकीत भाजपानं त्यांना पुन्हा मैदानात उतरवलं होतं. त्यांना कॉंग्रेसचे माजी मंत्री के. सी. पाडवी याचे पुत्र गोवाल पाडवी यांचं आव्हान होतं. त्यामुळं आता नंदुरबारमध्ये वकील विरुद्ध डॉक्टर या दोन उच्चशिक्षितांमध्ये सामना झाला. गोवाल पाडवी हे पेशानं वकील आहेत. तर भाजपाच्या उमेदवार हिना गावित या डॉक्टर आहेत. त्यामुळं नंदुरबारमधील या लढतीकडं राज्याचं लक्ष होतं. दुसरी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे 2019 मध्ये के. सी. पाडवी यांचा हिना गावित यांनी पराभव केला होता. आत के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनी वडिलांच्या पराभवाचा वचपा या निवडणुकीत काढला आहे, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

2014 पूर्वी काँग्रेसची एकाधिकारशाही : लक्ष्मण वेदू वळवी हे काँग्रेसचे नेते 1957 ते 1962 या काळात इथून खासदार होते. यानंतर कॉंग्रेसचे तुकाराम हुराजी गावित हे 1967 ते 1971 पर्यंत खासदार होते. 1977 ते 1980 या काळात सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांनी या जागेचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर 1980 ते 2009 पर्यंत ही जागा काँग्रेसच्या ताब्यात राहिली आणि इथून माणिकराव गावित खासदार होते. 2014 मध्ये देशात मोदी लाट आल्यामुळं काँग्रेसचा विजयरथ रोखला गेला. 2014 मध्ये भाजपानं हिना गावित यांना इथून तिकीट दिलं होतं. काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित यांचा पराभव करुन भाजपानं पहिल्यांदाच या मतदारसंघात विजय मिळवला. 2014 पूर्वी इथं केवळ काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. 2014 मध्ये भाजपानं इथून आपलं खातं उघडलं. त्यानंतर काँग्रेसचा विजयरथ रोखण्यात त्यांनी यश मिळवलं. 2019 मध्येही भाजापनं हिना गावित यांना तिकीट दिलं आणि त्या विजयी झाल्या.

कोण आहेत डॉ. हिना गावित :नंदुरबार जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा पारंपारिक गड राहिलाय. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पडण्याचं काम ज्या डॉ. विजयकुमार गावित यांनी केलं. त्यांच्या ज्येष्ठ कन्या डॉ. हिना गावित गेल्या दोन लोकसभेत त्यांचा विजय मिळवला होता. त्यांना भाजपानं उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तिसऱ्यांदा संधी दिली होती. काँग्रेसच्या माणिकराव गावितांना धोबी पछाड देत 2014 साली हिना गावीत विजयी झाल्या होत्या. 2019च्या निवडणुकीत त्यांनी के.सी. पाडवी यांचा पराभव केला होता. डॉ. हिना गावित यांचा आतापर्यंतचा प्रवास हा लोकल ते ग्लोबल असा राहिला आहे. हिना गावित या डॉक्टर असून त्यांचं MBBS पुण्यातून तर MD चं शिक्षण मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमधून झालं. आता त्यांनी खासदार असताना एलएलबीही केलंय. वाचन, प्रवास आणि खेळांची विशेष आवड असलेल्या हिना यांनी गेल्या 12-14 वर्षांपासून नंदुरबारच्या समाजकारणात प्रवेश केलाय. आरोग्य शिबीर आयोजित करुन हजारो लोकांवर मोफत उपचार करुन आदिवासी समाजात एक मानाचं स्थान त्यांनी मिळवलंय. अर्थात हे करत असताना वडिलांची साथ त्यांना लाभली. डॉ. गावितांनी आपल्या सत्तेचा वापर डॉ. हिना यांना जिल्ह्यात स्थापित करण्यासाठी केला. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून डॉ. हिना राजकारणात सक्रिय झाल्या होत्या.

कोण आहेत कॉंग्रेस उमेदवार गोवाल पाडवी :नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून के. सी पाडवी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. ऑगस्ट 1992 मध्ये गोवाल यांचा जन्म झाला होता. त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं. त्यांचं एलएलएम 2017 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईत झालं. तर 2015 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ते सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. 'सायबर लॉ'मध्ये विशेष प्राविण्य मिळवलं आहे. इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्सवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कायद्यांचाही त्यांनी अभ्यास केला आहे.

2019 मध्ये कशी झाली होती लढत :2019 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या डॉ. हिना गावीत यांचा विजय झाला होता. गावित यांनी काँग्रेसच्या के. सी. पाडवी यांचा 95 हजार 629 मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत त्यांच्या विजयाचं अंतर 11 हजार 276 मतांनी कमी झालं. त्यावेळी नंदुरबारची जागा भाजपासाठी आव्हानात्मक होती. कारण त्यांच्या विरोधात मतदारांचा, विशेषत: मराठा समाजाचा एक गट नाराज होता. धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला उपस्थित असताना त्यांच्या कारवर मराठा समाजातील लोकांनी हल्ला केल्यानं गावित चर्चेत आल्या होत्या.

या विधानसभा मतदारसंघाचा समावेश : नंदुरबार जिल्हा पहिल्यापासून काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण 2014 साली कॉंग्रेसचे सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले माणिकराव गावितांचा पराभव हिना गावीत यांनी केला होता. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपाकडे आहे. या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार जिल्ह्यामधील 4 व धुळे जिल्ह्यातील 2 असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.

मतदारसंघात काय होतं पक्षीय बलाबल? :नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास या मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चार तर धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघाचा यामध्ये समावेश आहे. यात अक्कलकुवा आणि नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत तर साक्री मतदार संघात शिंदे गटाचा आमदार आहे. नंदुरबार, शहादा आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत. नंदुरबार मतदार संघात भाजपाचे नेते आणि विद्यमान मंत्री डॉ. विजयकुमार गावित, शहादा मतदारसंघात भाजपाचे राजेश पाडवी आमदार आहेत. तर शिरपूर मतदारसंघात भाजपाचे काशिनाथ पावरा हे आमदार आहेत. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी पाडवी आमदार आहेत. नवापूरमध्ये आमदार शिरीष नाईक आमदार आहेत. तर साक्री विधानसभा मतदार संघात शिंदे गटाच्या मंजुळा गावित आमदार आहेत. पक्षीय बलाचा विचार केल्यास या लोकसभा मतदार संघात महायुतीच्या बोलबाला दिसून येत होता. यामध्ये सहा पैकी चार मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत.

जिल्ह्यातील परिस्थिती आणि पार्श्वभूमी : नंदुरबार लोकसभा मतदार संघ पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माणिकराव गावित यांनी सलग नऊ वेळा लोकसभेत या मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2014 च्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हीना गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी या मतदार संघात पहिल्यांदा भाजपाला यश मिळवून दिलं. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसकडून के. सी पाडवी यांना या मतदार संघात उमेदवारी देण्यात आली. त्यांनी चांगली लढत दिली. राज्यात विजयी झालेल्या भाजपा उमेदवारांचं मताधिक्य लाखांच्या पुढं आसताना या मतदार संघात भाजपाच्या उमेदवाराचा लीड कमी झाला होता.

मित्र पक्ष आणि पक्षांतर्गत नाराजी : नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजपाचे नेते डॉ. विजयकुमार गावित आणि त्यांच्या कन्या खासदार डॉ. हीना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या कार्यपद्धतीवर पक्षांतर्गत आणि महायुतीच्या घटक पक्षात नाराजी होती. मित्र पक्षांच्या विकास कामांना नेहमी कात्री लावण्याचा आरोप देखील झाला होता. तर शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी टोलमुक्त असणारा खासदार द्यावा, अशी मागणी केली होती. मित्र पक्षांनी उमेदवार बदलाची मागणी करत उघड नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे त्याला भाजपांतर्गत एका गटाच पाठींबा असल्याची चर्चा असल्यानं राजकीय वातावरण तापल्याचं दिसून आलं होतं.

जातीय समीकरण काय ? :नंदुरबार मतदारसंघात एसटी प्रवर्गाचे सर्वाधिक मतदार आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार, या जागेवर एसटी मतदारांची संख्या सुमारे 12 लाख 191 होती. त्याच वेळी अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या सुमारे 67 हजार 103 होती. जी एकूण लोकसंख्येच्या 3.5 टक्के होती. या जागेवर मुस्लिम मतदारही आहेत, ज्यांची संख्या 1 लाख 6 हजार 263 होती. लोकसंख्येचा विचार केल्यास त्या वेळी जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा 5.5 टक्के होता.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल

2019 : हिना गावित (विजयी उमेदवार- भाजप) 49.86 टक्के

2014 : हिना गावित (विजयी उमेदवार- भाजप) 51.89 टक्के

2009 : माणिकराव गावित (विजयी उमेदवार- काँग्रेस) 36.01 टक्के, सलग नऊ वेळा ते याच मतदार संघातून विजयी.

ABOUT THE AUTHOR

...view details