नांदेड : तेलुगु सुपरस्टार तथा आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे शनिवारी (16 नोव्हेंबर) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते. यावेळी पवन कल्याण यांचं भाषण ऐकण्यासाठी तसंच त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील भाजपाच्या उमेदवार श्रीजया चव्हाण आणि लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारार्थ पाळज येथे, तर भाजपाचे उमेदवार जितेश अंतापुरकर यांच्या प्रचारार्थ देगलूर येथे पवन कल्याण यांची सभा पार पडली.
काय म्हणाले पवन कल्याण? :यावेळीपवन कल्याण यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत पवन कल्याण म्हणाले की, "राम मंदिर, कलम 370 यासारखे कठोर निर्णय घेऊन देशाची आर्थिक बाजू मजबूत करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. तसंच त्यांनी देशाची आर्थिक स्थिती देखील मजबूत केली आहे", असं पवन कल्याण म्हणाले.
पवन कल्याण नांदेड सभा (ETV Bharat Reporter) 'लाडकी बहीण योजने'विषयी काय म्हणाले? : यावेळी राज्य सरकारच्या योजनांचीही त्यांनी माहिती दिली. 'लाडकी बहीण योजने'च्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती होईल, असा विश्वास देखील पवन कल्याण यांनी व्यक्त केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत डॉक्टर संतुकराव हंबर्डे तर विधानसभेसाठी श्रीजया चव्हाण आणि जितेश अंतापुरकर यांच्या पाठीशी मतदारांनी उभं राहावं," असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.
पवन कल्याण यांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी : पवन कल्याण यांना पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी महिलांची संख्य देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. पवन कल्याण यांचं हेलिकॉप्टर उतरताच नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचं स्वागत केलं. भव्य अशा सभामंडपात पवन कल्याण यांची सभा पार पडली. यावेळी त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.
हेही वाचा -
- उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीजया चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया; अशोक चव्हाणांनी मानले आभार
- भाजपाच्या पहिल्याच यादीत अशोक चव्हाणांच्या मुलीसह 13 महिलांना संधी; कुणाला मिळाली उमेदवारी?