नागपूर-गेल्या काही दिवसांपासूननायलॉन मांज्यानं अनेकांना दुखापत झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे आता बाईकस्वारही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक उपाय योजत आहेत. कारण मागील आठ दिवसांमध्ये नायलॉन मांजा गळ्यात अडकून राज्यभरात अनेक जण गंभीर जखमी झालेत. नागपूर शहरातील तरुणांमध्येही मकरसंक्रांतीचा उत्साह ओसंडून वाहत असला तरी वाहनचालकांचा जीव मात्र टांगणीला लागलाय. त्यामुळे आज नागपूर पोलिसांनी शहरातील सर्व उड्डाणपूल बंद ठेवलेत. खरं तर आजपासून मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीला उधाण आलं असून, रविवारपर्यंत उत्साह असाच कायम राहणार असल्याने रस्त्यावरून जाताना किंवा वाहन चालवताना गळ्यात दुपट्टा किंवा रुमाल बांधूनच प्रवास करावा लागणार आहे.
18 लाखांच्या मांज्यावर चालवला बुलडोझर -नागपूर पोलिसांनी नायलॉन मांज्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. नायलॉन मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नसल्याचा थेट इशारा पोलिसांनी दिलाय. गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी जप्त केलेला 18 लाखांच्या मांज्यावर बुलडोझर चालवून नायलॉन मांजा नष्ट केलाय. पुढील काही दिवस पतंगबाजी सुरू राहणार आहे. मकरसंक्रांतीच्या 8 दिवस आधीपासून पतंगबाजीला सुरुवात झालीय. पतंग विक्रेत्यांकडून छुप्या पद्धतीने नायलॉन मांज्याची विक्री सुरू केलेली होती. मात्र, नागपूर पोलिसांनी या मांज्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उभारून तब्बल 18 लाख रुपयांचा मांजा जप्त केल्यानंतर तो मुद्देमाल नष्ट केलाय.
छुप्या मार्गाने नायलॉन मांज्याची विक्री सुरू-बच्चे कंपनीसोबतच सर्व वयोगटातील लोकांचा आवडता उत्सव म्हणजे पतंगबाजी उत्सव सुरू झालाय. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण शहरात पतंगबाजी सुरू झालेली आहे. मात्र, ही पतंगबाजी जेवढा आनंद देते, त्यापेक्षा अधिक दुःख, वेदना अन् त्रासदायक ठरतेय. याचं कारण म्हणजे नायलॉन मांजा आहे. जीवघेणा ठरत असलेल्या या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असतानादेखील छुप्या मार्गाने नायलॉन मांजा विक्री केला जातोय. नागपूर पोलिसांनी गेल्या आठ दिवसांत लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला असला तरी विक्रेते आणि ग्राहकांमध्ये जराही कायद्याची भीती नसल्याने नायलॉन मांजा सर्रासपणे विकला जातोय. परंतु आता नागपूर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांना अद्दल घडवण्याचा निर्धार केलाय. सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीने पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलीय.