महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संघाच्या बौद्धिकाला अजित पवारांनी यायला पाहिजे होतं, चित्रा वाघ यांचं विधान - NAGPUR WINTER SESSION

अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं संघाच्या बौद्धिकाकडे पाठ फिरवली असून, शिंदे सेनेचे एकनाथ शिंदेंनी संघाच्या बौद्धिकाला उपस्थिती दर्शवल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरत आहे.

Chitra Wagh and Ajit Pawar
चित्रा वाघ आणि अजित पवार (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

Updated : 5 hours ago

मुंबई/नागपूर :विधिमंडळाचे नागपूर येथे अधिवेशन असताना भाजपाच्या आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग या मुख्यालयात हजेरी लावून तेथील बौद्धिकाला उपस्थित राहावे लागते. हिंदुत्वाची रूपरेषा, संघाच्या कामकाजाची पद्धत, संघाचे आजपर्यंतचे काम, संघाचा इतिहास, संघाची वाटचाल याबाबत उपस्थित आमदारांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती दिली जाते. संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार, माधव गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतिस्थळांना अभिवादन केले जाते. संघाच्या माध्यमातून देशभक्ती आणि देश प्रेमाचे धडे दिले जातात. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेक आमदारांनी संघाच्या कामगिरीचे कौतुक केले आणि या कार्यक्रमातून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केलंय. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं संघाच्या बौद्धिकाकडे पाठ फिरवली असून, शिंदे सेनेचे एकनाथ शिंदेंनी संघाच्या बौद्धिकाला उपस्थिती दर्शवल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरत आहे.

हेडगेवार यांच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते :यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रियासुद्धा दिलीय. संघ परिवारांशी माझे नाते बालपणापासूनचे आहे. लहानपणी मी संघाच्या शाखेत जायचो. संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार एकसमानच आहेत. निरपेक्ष भावनेने कसे काम करावे, हे संघाकडून शिकावे. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही संघातूनच झाली. देवेंद्र फडणवीस हे संघाचे स्वयंसेवक आहेत, ते मुख्यमंत्री झाले ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. मी यापूर्वीही रेशीमबागेत आलोय, हेडगेवार यांच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.

नवीन ऊर्जा मिळते- केसरकर :शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर याबाबत विचारले असता ते म्हणाले की, संघाच्या बौद्धिक कार्यक्रमाला उपस्थित राहून एक नव्या प्रकारची ऊर्जा मिळते. विकासाच्या मार्गावर वाटचाल करताना पुढे जाण्यासाठी सुयोग्य असे मार्गदर्शन मिळते. डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या जीवनाबाबत माहिती मिळते, त्याच्यातून प्रोत्साहन मिळते.

हेडगेवार आणि गोळवलकरांना वंदन - भातखळकर :भाजपाचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, हेडगेवार आणि गोळवलकर यांना वंदन करण्यात येते. संघाच्या एकूण कामगिरीबद्दल उपस्थित आमदारांना मार्गदर्शन करण्यात येते. सर्व आमदार या ठिकाणी एकत्रित येतात. संघाची कामगिरी पाहून स्तिमित व्हायला होते.

संघाच्या मुख्यालयात आल्यावर वेगळी ऊर्जा मिळते- केळकर :ठाण्यातील भाजपाचे आमदार संजय केळकर म्हणाले की, संघ ही भाजपाची मातृसंस्था आहे. संघ ही मातृशक्ती आहे, त्यामुळे नागपूर येथे होणाऱ्या दिवाळी अधिवेशन काळात भाजपाच्या सर्व आमदारांना निमंत्रण दिले जाते. रेशीम बाग हे संघाचे मुख्यालय असल्याने या ठिकाणी आमदारांना निमंत्रित करून संघाबद्दल माहिती दिली जाते. काही आमदार संघाच्या पार्श्वभूमीचे नसतात, संघाबाबत त्यांना माहिती देऊन भाजपाची मातृसंस्था असलेल्या संघाशी एक प्रकारे कनेक्ट केले जाते.

नवीन प्रेरणा आणि उत्साह मिळतो - कुडाळकर : शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर म्हणाले की, संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे राष्ट्रासाठी मोठे योगदान आहे. त्यांना अभिवादन करून त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आम्ही जातो. त्यांच्या महान कार्यापासून प्रेरणा घेऊन पुढील वाटचाल करण्यासाठी आम्हाला अधिक उत्साह मिळतो.

यंदा नेहमीपेक्षा अधिक आमदार उपस्थित- मुनगंटीवार :भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रिपद डावलल्याने नाराज झालेले सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. यंदा मोठ्या संख्येने आमदार या ठिकाणी येत असल्याची माहिती त्यांनी दिली. महायुतीकडे 237 आमदार असल्याने नेहमीपेक्षा जास्त आमदार आज येथे आल्याचे ते म्हणालेत.

पक्षाकडून सूचना नाही, स्वयंप्रेरणेने हजर - राजू कारेमोरे :अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी या बौद्धिकाला उपस्थिती दर्शवली. या ठिकाणी येण्याबाबत पक्षाकडून कोणतीही सूचना आली नव्हती, आमच्या पक्षाचे इतर आमदार येतील की नाही याची माहिती नाही, मात्र मी या ठिकाणी स्वयंप्रेरणेने आलो आहे, असे ते म्हणालेत.


बंजारा समाजासाठी संघाचे मोठे कार्य- राठोड : शिवसेनेचे मंत्री संजय राठोड म्हणाले की, बंजारा समाजाच्या विविध समस्या सोडवण्यामध्ये संघाची मोलाची भूमिका आहे. बंजारा समाजासाठी संघाने मोठे काम केले आणि करीत आहे. संघ स्थानी आम्ही नेहमीच येत असतो आणि यापुढेही येत राहू. निवडणुकांमध्ये देखील आम्हाला संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, त्याचा लाभ आम्हाला झालाय.

संघाचा लाभ अजित पवारांनाही, त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते - वाघ :भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांनी येथे यायलाच हवे होते, अशी भूमिका मांडली. संघाने महायुतीसाठी काम केलंय, केवळ भाजपासाठी किंवा शिवसेनेसाठी नाही. संघाने केलेल्या कामाचा लाभ भाजपा शिवसेनासह राष्ट्रवादी काँग्रेसलाही झालाय, त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदारांनी येथे येणे अपेक्षित होते, असे चित्रा वाघ म्हणाल्यात.

संघ आणि शिवसेना समान विचारांचे -दादा भुसे : शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी संघ आणि शिवसेना वेगळे नसून यंदाच्या निवडणुकीत संघाने प्रचंड मोलाची भूमिका बजावली, असे सांगितले. अजित पवार यांनी इथे या ठिकाणी येणे आवश्यक होते, असे ते म्हणाले.

व्होट जिहादला संघाकडून प्रत्युत्तर -गुलाबराव पाटील :मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांनी या ठिकाणी यायला हरकत नव्हती, असे म्हटले आहे. संघाने पडद्यामागून नव्हे तर पडद्यावरच भूमिका बजावली. संघाकडून जिहादला समर्पक नव्हे तर महाउत्तर देण्यात आले. संघ ही हिंदुत्वाचा विचार करणारी संघटना आहे. बाळासाहेब ठाकरे आणि संघाचे विचार एकसमान होते. त्यामुळे इथे आल्यानंतर आम्हाला वेगळ्या ठिकाणी आलो, असं जाणवत नाही. सर्वच पक्षांनी इथे यायला हवे, असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा-

विधानसभा हिवाळी अधिवेशन 2024 : संघाच्या शाखेतून माझी सुरुवात, मग शिवसेनेत आलो; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
अजित पवार यांची बौद्धिकला दांडी; एकनाथ शिंदे यांनी लावली हजेरी - RSS BAUDHIK NAGPUR

Last Updated : 5 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details