मुंबई - गेट वे ऑफ इंडियाजवळ बुधवारी मोठा अपघात झालाय. बुधवारी दुपारी 4 वाजता नौदलाची मोटर बोट 'नीलकमल' या प्रवासी बोटीला धडकली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये तीन नौदलाच्या अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. तर या दुर्घटनेत 99 जणांना वाचवण्यात यश आलंय. या दुर्घटनेनंतर गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा ही प्रवासी जलवाहतूक पुन्हा एकदा पूर्वपदावर आली असून, पर्यटकांची मोठी गर्दी गेट वे परिसरात पाहायला मिळतेय.
एलिफंटा गुहा जलवाहतूक पुन्हा एकदा सुरळीत : नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी पुन्हा एकदा गेटवे ऑफ इंडिया येथे पाहायला मिळत असून, एलिफंटा गुहा जलवाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झालीय. मात्र, या वाहतुकीत सध्या बदल पाहायला मिळत असून, पर्यटकांना अप्पर डेकवर जाण्यास मज्जाव करण्यात आलाय. त्याचप्रमाणे मेरिटाईम बोर्डचे अधिकारी आणि कर्मचारी या जेटीवर उपस्थित असून, पर्यटकांना लाईफ जॅकेट परिधान करणे सक्तीचे करण्यात आलंय. या संदर्भात आम्ही पर्यटकांशी बातचीत केली असता, पर्यटकांनी सांगितले की, "काल जी दुर्घटना झाली तो एक अपघात होता. आम्ही लाईफ जॅकेट घातलेलं आहे. त्यामुळे आम्हाला भीती नाही. आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने एलिफंटा गुहा पाहण्यासाठी निघालो आहोत."
दुर्घटनाग्रस्त बोटीत काही परदेशी पर्यटक : एलिफंटा गुहा पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. विशेष म्हणजे दुर्घटनाग्रस्त बोटीत काही परदेशी पर्यटकदेखील होते. तर यूके येथे राहणारे गुजराती वृद्ध दाम्पत्यदेखील एलिफंटा गुहा पाहण्यासाठी निघाले होते. आम्ही या दाम्पत्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, "या घटनेबाबत आम्हाला माहिती नाही. मात्र, आम्ही आता या बोटीमध्ये बसलोय, तिथे आम्हाला सुरक्षित वाटत आहे. त्यामुळे आम्हाला भीती नाही."
केवळ 85 पर्यटकांना नेण्यासच परवानगी : दरम्यान, मेरिटाईम बोर्डाच्या नियमानुसार एका प्रवासी बोटीतून केवळ 85 पर्यटकांना नेण्यासच परवानगी आहे. या 85 पर्यटकांसोबत बोटीतील 5 कर्मचारी असे एकूण 90 जण एका बोटीतून प्रवास करू शकतात. सोबतच जेव्हा या बोट मालकांना लायसन्स दिले जाते, त्यावेळी अप्पर डेकवर प्रवासी वाहतूक करू शकत नाही, असा नियम आहे. मात्र, गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा या मार्गावरील अनेक बोटींवर पर्यटकांना बसण्यासाठी खुर्च्या लावलेल्या दिसून येतात.
हेही वाचा