पुणे : राष्ट्रवादीतील फुटीनंतर आजही अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांना शरद पवार यांना का सोडलं? असा प्रश्न विचारला जातो. आज देखील राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले, "२०१४ मध्ये शरद पवार यांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यानंतरही अनेक वर्ष भाजपाला पाठिंबा देण्यासंदर्भात तळ्यात-मळ्यात भूमिका होती. अखेर मी अजित पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही सध्या राष्ट्रवादी पक्ष म्हणून राजकीय दृष्ट्या भाजपासोबत आहोत. आम्ही भाजपासोबत लग्न केलेलं नाही, अशी भूमिका यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
छगन भुजबळ यांची विशेष मुलाखत : जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या युवा संसदेतील दुसऱ्या संसद कट्टामध्ये विशेष मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपल्या राजकारणाचा पट विद्यार्थ्यांसमोर उलगडला.
तर माणूस दु:खी होतो : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून असणारा मी नेता आहे. तरीही अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर आज मला मंत्रिपद का मिळालं नाही? याची खंत वाटते. मला पद महत्त्वाचं नाही. परंतु, मानसन्मान जर मिळाला नाही तर, माणूस दुःखी होतो अशी खंतही छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.
भुजबळ राज्यपाल होणार? : भुजबळ यांना तुम्ही आता राज्यपाल होणार का? असं विचारलं असता ते की, "राज्यपाल हे अतिशय मानाचं पद आहे. त्या पदाचा मी मान राखतो. परंतु, माझा स्वभाव हा अन्यायाविरोधात बोलण्याचा आणि संघर्ष करण्याचा आहे राज्यपाल होऊन मी सर्वसामान्यांसाठी बोलू शकत नाही. मला राज्यपाल करणं म्हणजे एक प्रकारे छगन भुजबळच्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. त्यामुळेच मी राज्यपालपद स्वीकारू शकत नाही" असं छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मतभेद झाल्यामुळं शिवसेना सोडली : छगन भुजबळ म्हणाले, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे मी सर्वसामान्य भाजी विक्रेत्यापासून राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकलो. त्यानंतर मंडल आयोगाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यामुळं शिवसेनेतून बाहेर पडलो. मी जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर त्याचवेळी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. तसंच काँग्रेसमध्ये राहून काम केलं असतं आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला नसता तर, त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री होण्याची मला संधी होती. परंतु, ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या दोन संधी सोडून दिल्या. मी आजही पद नसताना लढत राहणार आहे. असं देखील यावेळी भुजबळ म्हणाले.
शरद पवारांनी राजीनामा घेण्याची घाई केली : तेलगी प्रकरणाशी काहीही संबंध नसताना शरद पवार यांनी माझा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला. परंतु, त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये माझ्यावर कोणतेही आरोप झाले नाहीत आणि ते सिद्धही झाले नाही, त्यामुळं एक प्रकारे शरद पवार यांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली.
तरीही ओबीसींच्या हक्कासाठी लढत राहणार : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये मी ओबीसींच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे मराठा समाजाच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी भावना निर्माण झाली. त्याचा निश्चितच फटका मला बसला आणि माझं मताधिक्य कमी झालं. परंतु, तरीही मी ओबीसींच्या हक्कांसाठी लढत राहणार आहे. जरांगेंच्या आंदोलनामध्ये माझा वापर करून घेतला असं अनेकांना वाटतं. परंतु, छगन भुजबळचा कोणीही वापर करू शकत नाही आणि मी माझा वापर कोणालाही करू देत नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- लाडकी बहीण योजनेबद्दल माजी मंत्री छगन भुजबळ स्पष्टच बोलले; म्हणाले, "खात्यात गेलेले पैसे परत..."
- राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू, “तुम्ही जो शब्दांचा वापरताय तो योग्य नाही"... छगन भुजबळ यांच्याबाबत काय म्हणाले प्रफुल पटेल?
- छगन भुजबळ नक्की अधिवेशनात सहभागी होतील सुनिल तटकरे यांची माहिती; भुजबळ यांची हजेरी पण...