अमरावती : मेळघाटातल्या अनेक गावामध्ये पावसाळ्यातही पिण्याचं पाणी मिळत नाही अशी परिस्थिती असते. असं असताना मेळघाटच्या पायथ्याशी मात्र अशी एक गाव विहीर आहे, जिला बाराही महिने पाणी राहातं. विहिरीतलं पाणी अगदी हाताने बाहेर काढता येईल इतकी तुडुंब ही विहीर पाण्यानं भरलेली असते. विशेष म्हणजे या विहिरीतलं पाणी झऱ्याच्या स्वरूपात विहिरीबाहेर जमिनीवरून सतत वाहात राहतं. अगदी सुरुवातीला केवळ पाच फुटावर या विहिरीला पाणी लागलं. पाणीच पाणी असणारी ही विहीर या परिसरात 'बाळ समुद्र' नावाने ओळखली जाते. ग्रामपंचायतीनं या विहिरीवर मोटर बसवली असून त्यातून गावाला पाणी मिळतं.
पावसाळ्यात विहिरीला येतो पूर : "नदीला पूर येतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र विहिरीला पूर येतो हे वाक्याच चकित करणारं आहे. मात्र मेळघाटातील 'बाळ समुद्र' नावाच्या विहिरीला पावसाळ्यात दरवर्षी पूर येतो हे खरं आहे. परतवाडा-चिखलदरा मार्गावर धामणगाव गढी या गावाच्या वेशीवर ही विहीर आहे. बाराही महिने पाण्याने तुडुंब भरून असणाऱ्या या विहिरीला पावसाळ्यात अगदी पूर येतो. मुसळधार पाऊस झाला की या विहिरीलगतचे नदी, नाले तुडुंब भरून वाहत असतानाच पाण्याने अगदी तुडुंब भरलेल्या या विहिरीतलं पाणी विहिरी बाहेर ओसंडून वाहायला लागतं. उन्हाळ्यात संपूर्ण गावात दुष्काळ पडतो. त्यावेळी त्या विहिरीला मात्र तुडुंब पाणी असतं, असं धामणगाव गढी येथील रहिवासी सुनील गावंडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
ही विहीर म्हणजे दादाजी धुनीवाले यांचा प्रसाद : "1908-09 च्या उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत होती. त्या दुष्काळी परिस्थितीतच दादाजी धुनीवाले हे आपल्या एका सहकाऱ्यासोबत अगदी तरुणावस्थेत धामणगाव गढी परिसरात आले होते. गावात पिण्यासाठी देखील पाणी नाही हे पाहून त्यांनी गावाबाहेर एका ठिकाणी पाणी आहे असं सांगून स्वत: विहीर खोदण्यास सुरुवात केली. अवघ्या पाच फुटांवर विहिरीला भर उन्हाळ्यात पाणी लागलं. ग्रामस्थांसाठी हा एक चमत्कारच होता. पुढे ही विहीर आणखी थोडी खोल खोदण्यात आली. या विहिरीला कायम पाणी असतं. या विहिरीतून पाण्याचे झरे कायम बाहेर वाहतात, " असं गावातील रहिवासी रमेश जोशी यांनी सांगितलं.
विहिरीमुळं गावात पाणीच पाणी : दादाजी धुनीवाले यांनी खोदलेल्या या विहिरीला भरपूर पाणी असल्यामुळं ग्रामस्थांनी या विहिरीला 'बाळ समुद्र' असं नाव दिलं. विहिरीला लागूनच स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यविधी केल्यावर ग्रामस्थ या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करतात. या विहिरीलगत जनावरांना पाणी सहज पिता यावं म्हणून हौद केला. या ठिकाणी गावातील जनावरांसह लगतच्या गावातील गाई, म्हशी मोठ्या संख्येनं येथे पाणी पिण्यासाठी येतात. हिवाळ्यात ज्याप्रमाणे या विहिरीतून पाणी बाहेर वाहतं, तसंच ते उन्हाळ्यात देखील वाहताना दिसतं. उन्हाळ्यातही येथे मुबलक पाणी राहतं. आज गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे पाणी आलं असलं तरी, या विहिरीचं महत्त्व मात्र कायम आहे, असं देखील सुखदेव झांबरे यांनी सांगितलं.
हेही वाचा -