नागपूर Nagpur News : मजुरीचे पैसे दिले नाहीत यावरुन उद्भवलेल्या वादातून नागपूरच्या नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा या गावात दोघांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेला आता राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय. त्यामुळं हे प्रकरण अजूनच चिघळण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं :सतीश बाबाराव फुले (वय 35) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो आरोपी प्रवीण अशोकराव बोरडेकडं मजुरीचं काम करत होता. गुरुवारी (23 मे) सतीश आपले मजुरीचे पैसे मागण्यासाठी गेला असता प्रवीणनं पैसे देण्यास नकार दिला. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. प्रवीणनं सतीशला जबरी मारहाण केली. यादरम्यान सतीशचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नरखेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी प्रवीण बोरडेला अटक करुन सतीशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तसंच या प्रकरणी सध्या पुढील तपास सुरू आहे.
घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न : या घटनेप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असतानाच दुसरीकडं मात्र रामटेक लोकसभा मतदारसंघात कुणाला कौल मिळेल?, यावरून झालेल्या वादातून हत्या झाल्याची अफवा काहींनी पसरवल्यामुळं एकूण या प्रकरणाला राजकीय वळण दिलं जात असल्याचा आरोप मृतक सतीशचे नातेवाईक उमेश फुले यांनी केलाय.
पोलिसांनी शक्यता फेटाळली : देशाच्या प्रत्येक राज्यात, शहरात, गावागावातील चौका-चौकात लोकसभा निवडणुकीच्या चर्चा रंगलेल्या आहेत. विविध पक्षातील कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक देखील अशा चर्चांच्या माध्यमातूनच आपलं वैयक्तिक मत मित्रांजवळ व्यक्त करताय. नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघातील नरखेड येथे दोन मित्रांमध्ये भांडण सुरू असताना कोण जिंकून येईल यावरून वाद झाला आणि प्रवीण बोरडेनं केलेल्या मारहाणीत सतीश फुलेचा मृत्यू झाला असल्याची चर्चा सुरू झाली असली तरी नरखेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णकांत तिवारी यांनी हे कारण फेटाळून लावलंय.
हेही वाचा -
- संभाजीनगरात 'मशाल' अन् 'धनुष्यबाणात' तुफान राडा ; दोन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी - Lok Sabha Election 2024
- गर्दी न जमल्यानं झाला वाद; माजी आमदार आणि जिल्हाप्रमुखांमध्ये हाणामारी - Amravati Lok Sabha Constituency
- मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी, अपक्ष उमेदवार देण्याबाबत होती बैठक - Maratha community clashed