नागपूर Champa Village Plastic Bank News : नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील चांपा ग्रामपंचतीनं एक उत्कृष्ट उपक्रम सुरू केलाय. गावाला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी गावात 'प्लास्टिक बँक' सुरू करण्यात आलीय. गावातील संपूर्ण प्लास्टिकचा कचरा एकत्र करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी किंवा त्याला रिसायकल करुन पुन्हा त्याचा वापर करण्यासाठी ही योजना आखली जात आहे. यासाठी गावातील विविध ठिकाणी प्लास्टिक बँक (छोटे कचरा घर) उभारुन प्लास्टिक कचरा कुठंही न फेकता तो या बँकमध्येच टाकण्याचं आवाहन चांपा ग्रामपंचातीनं गावातील नागरिकांना केलय. तसंच नागरिकांचा देखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं बघायला मिळतंय.
पावसाळ्यात होणारा त्रास संपला : चांपा गाव उमरेड आणि नागपूर महामार्गावर आहे. तसंच रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक दुकानं आणि हॉटेल्स आहेत. त्यामुळं इथं प्लास्टिकच्या कचरा मोठ्या प्रमाणात जमा होतो. पुढं हेच प्लास्टिक नाल्यांमध्ये अडकतं आणि त्यामुळं पावसाळ्यात नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येतं, म्हणून चांपा ग्रामपंचायतीमधील प्रमुख रस्ते आणि चौकाचौकात जाळीदार प्लास्टिक बँक लावण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत परिसर, गावातील चौक, चहा-टपरी, हॉटेल्स, बसस्टॉप, अशा विविध ठिकाणी जाळीदार प्लास्टिक बँक उभारण्यात आल्या आहेत.