ठाणे Thane Murder News : दारूची पार्टी (Alcohol Party) सुरू असतानाच दोघांमध्ये उसनवारीच्या पैश्यावरून वाद होऊन सहा जणांच्या टोळक्याने २५ वर्षीय तरुणाचा खून केल्याची (Murder News) धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी भागात घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासातच दोन हल्लेखोरांसह एका बालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
हल्लेखोरांचे नावे : यातील तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. रुपेश महादेव कांबळे (वय १९, रा. सूचक नाका, कोळशेवाडी कल्याण पूर्व), मोहन रमेश बनसोडे (वय १८, रा. रा. महात्मा फुले नगर झोपडपट्टी, सुचक नाका, कोळशेवाडी कल्याण पूर्व.) आणि एक बालक असे अटक केलेल्या हल्लेखोरांची नावं आहेत. सुरज सोमा हिलम (वय २५ ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुचक नाका, कल्याण पूर्व भागातील सुचक नाका परिसरात मृतक सुरज सोमा हिलम हा कुटुंबासह राहात होता. त्यातच २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास नेतिवली टेकडी भागात एका बारमध्ये मद्यपान करत होता. त्यावेळी आरोपीही त्याच्यासोबत दारू पार्टी करत होते. दारू पीत असतानाच आरोपी आणि मृतकमध्ये उसनवारीच्या पैश्यावरून वाद झाला. दारू ढोसल्यानंतर हा वाद आणखीच विकोपाला गेला. त्यानंतर अनोळखी ६ इसमांनी लाकडी फळीनं, झाडूनं आणि दगड फेकून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले. याप्रकरणी मयतचा भाऊ नामे पिंट्या सोमा हिलम याचे फिर्यादीवरून कोळशेवाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे २ एप्रिल रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता.