मुंबई : पुढील आठवड्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. येत्या 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या काही भागांमध्ये 30 तासांसाठी तात्पुरती पाणी कपात केली जाणार असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केलय. त्यामुळं मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलय. या पाणी कपातीचा परिणाम प्रामुख्यानं एस प्रभाग, एल प्रभाग, के पूर्व प्रभाग, एच पूर्व प्रभाग आणि जी उत्तर या प्रभागांवर होणार आहे. थोडक्यात भांडुप, अंधेरी पूर्व, सांताक्रूझ पूर्व, कुर्ला, दादर या परिसरावर या पाणी कपातीचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.
पालिकेनं काय म्हटलंय? : याबाबत पालिका प्रशासनानं म्हटलंय की, पवई अँकर ब्लॉक आणि मरोशी वॉटर टनेल दरम्यान नवीन 2 हजार 400 मिमी व्यासाची पाण्याची पाइपलाइन सुरू झाल्यामुळं पाणीकपात करण्यात आली आहे. सध्याच्या 1 हजार 800 मिमीच्या तानसा पूर्व आणि पश्चिम पाइपलाइन तात्पुरत्या डिस्कनेक्ट करून नवीन पाइपलाइन जोडण्याचाही या कामात समावेश आहे. येणाऱ्या पाईपलाईनमुळं मुंबईकरांना अधिक प्रेशरनं पाणीपुरवठा करणे शक्य होणार असल्याचं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळं पालिका प्रशासनानं मुंबईकरांना त्यांच्या गरजेनुसार पुरेशा प्रमाणात पाण्याचा साठा करण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच पाइपलाइनचं काम पूर्ण झाल्यानंतर काही काळ घाणेरडं पाणी पुरवठा केला जाऊ शकतो, अशा स्थितीत मुंबईकरांनी ते पाणी आधी फिल्टर करा किंवा उकळून घ्या आणि नंतर वापरा अशा सूचना देखील पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
'या' प्रभागांवर होणार पाणी कपातीचा परिणाम :
एस वॉर्ड - श्री राम पाडा, खिंडी पाडा, मिलिंद नगर, शिवाजी नगर, भाईंदर हिल, गौतम नगर आणि इतर भागात 5 आणि 6 फेब्रुवारी 2025 रोजी 30 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील.