मुंबई Mumbai Accident News :कानात हेडफोन घालून रेल्वे रुळावरून जाणं पोलीस हवालदाराच्या जीवावर बेतलं आहे. कानात हेडफोन घालून रेल्वे रूळावर चालत असताना लोकलची धडक बसल्यानं रवींद्र हाके (वय 28) या पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली, अशी माहिती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी दिली.
हेडफोन घालणं पडलं महागात :रवींद्र हाके या पोलीस कर्मचाऱ्याचा विक्रोळी ते कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या धडकेत मृत्यू झाला. विक्रोळी ते कांजूरमार्गदरम्यान रुळावरून चालत असताना टॉवर वॅगन या लोकलनं त्यांना धडक दिली. टॉवर वॅगन ही लोकल ट्रेन मेगाब्लॉकदरम्यान वापरली जाते. ही लोकल ट्रेन तीन ते चार डब्यांची असते. आज सकाळपासून मेगाब्लॉक असल्यानं ही लोकल ट्रेन फेऱ्या मारत असताना हा अपघात झाला. कानात हेडफोन असल्यानं ट्रेनच्या चालकानं हॉर्न वाजविला. मात्र, वेळीच बाजूला न झाल्यानं पोलीस कर्मचाऱ्याला जोरदार धडक बसली. याप्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केलीय.
उपचारा आधीच मृत्यू : कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी रवींद्र हाके हे रूम पाहण्यासाठी नाईट शिफ्ट संपवून कांजूर मार्ग येथे मित्राच्या घरी चालले होते. ते लोकल आर्मस - 1 मध्ये काम करायचे. रवींद्र हाके हे मदनवाडी, तालुका इंदापूर येथील रहिवासी होते. आज सकाळी 11:30 विक्रोळी रेल्वे स्टेशन मास्टर यादव यांनी पोलीस कॉन्स्टेबल भोये यांना अपघाताची माहिती दिली. स्टेशन मास्टर यांनी विक्रोळी ते कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन दरम्यान ट्रॅकच्या जवळ लोकलच्या धडकेत एक अज्ञात व्यक्ती जखमी झाल्याची माहिती दिली. त्यांना उपचारसाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचारा आधीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
हेही वाचा
- ड्रग्ज मिळून आल्याची बतावणी करत डॉक्टर, उद्योजकाला 31 लाखांचा गंडा - Nashik Crime
- पुण्यातील नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका? स्वत: पोलीस आयुक्तांनी दिलं पत्र - Terrorist Attack Possibility Pune
- बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटची 5 हजार 765 कोटींची मालमत्ता जप्त - Dnyanradha Multistate Bank