मुंबईCough Syrup Smuggling Case Mumbai :कोडिनद्वारे बनवण्यात आलेल्या आणि नशेसाठी वापर होत असलेल्या कफ सिरपच्या (सीबीसीएस) तस्करीमध्ये गुंतलेल्या तीन आरोपींना मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली. ही तस्करी आंतरराज्यात चालवण्यात येणाऱ्या टोळीकडून करण्यात येत होती. एनसीबीला मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत आरोपींकडून कफ सिरपच्या ३ हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याचे वजन ३०० किलो असून त्याची बाजारातील किंमत १५ लाख रुपये आहे.
पाळत ठेवून छापामारी :या कफ सिरपचा नशा करण्यासाठी गैरवापर केला जातो. त्यामुळे अशा प्रकारे गैरवापर करणाऱ्यांवर पाळत ठेवून मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने ही कारवाई केली. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरात हे कफ सिरप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी पाळत ठेवून छापा मारून ही कारवाई करण्यात आली. एनसीबी आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टर्सच्या माध्यमातून दुसऱ्या नावाने हे कफ सिरप मागवले गेले; परंतु त्याची वाहतूक करताना त्याची ओळख लपवण्यात आली होती.