मुंबई Ratan Tata On Dog Blood Donor : रतन टाटा (Ratan Tata) यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये उद्योगपती रतन टाटा यांनी चक्क मुंबईकरांकडंच मदत मागितल्यानं या पोस्टची विशेष चर्चा होत आहे. ही पोस्ट देखील तितकीच भावनिक असल्यानं आधीच देशवासीयांच्या मनात असलेल्या रतन टाटा यांच्या बद्दलचा आदर अधिक वाढला आहे. या पोस्टमध्ये रतन टाटा यांनी मुंबईतील त्यांच्या 'टाटा ॲनिमल हॉस्पिटल'मध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका श्वानाला रक्ताची आवश्यकता असल्यानं मुंबईकरांकडं मदत मागितली आहे. इतक्या मोठ्या उद्योगपतीनं एका श्वानासाठी मदत मागितल्यानं सध्या रतन टाटा यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा सर्वत्र होत आहे.
श्वानाच्या रक्ताची केली मागणी : आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये टाटा यांनी म्हटलं की, जखमी 7 महिन्यांच्या श्वानासाठी रक्ताची आवश्यकता आहे. या श्र्वानाला मोठ्या प्रमाणात ताप आणि अशक्तपणा असल्यानं त्याला रक्त चढवण्याची आवश्यकता आहे. यासाठी एका श्वानाच्या रक्ताची आवश्यकता असून, रक्तदान करणारा श्वान कशा पद्धतीचा असावा याची माहिती देखील रतन टाटा यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे. रतन टाटा यांच्या पोस्टनुसार, रक्तदाता श्वान हा वैद्यकीयदृष्ट्या निरोगी असावा आणि त्याचं वय 1 ते 8 वर्षांच्या दरम्यान असावं. तसेच, त्याचं वजन 25 किलो किंवा त्यापेक्षा जास्त असावं, त्याचं लसीकरण केलं असावं, या श्वानला रेबीज प्रतिबंधक लसीकरण केलेले आवश्यक असून, त्याला कोणत्याही मोठ्या आजाराने ग्रासलेले नसावे. हे निकष पूर्ण करणारे श्र्वानच रक्तदान करू शकते.