मुंबई SBI Service Manager Arrested :आरोपी सर्व्हिस मॅनेजरसह त्याच्या मित्रालाही अटक करण्यात भांडुप पोलिसांना यश आलंय. या दोन्ही आरोपींना 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय खंडागळे यांनी दिलीय.
बॅंकेचा व्यवस्थापकच मुख्य आरोपी : भांडुप पोलिसांनी सांगितलं की, एसबीआय बँकेच्या मुलुंड पश्चिम येथील शाखेनं 1.94 कोटी किमतीचं सोनं तारण ठेऊन कर्ज दिलं होतं. तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या किमतीच्या सुमारे 65 टक्के कर्ज देण्यात आलं होतं. हे दागिने लॉकरमध्ये ठेवले होते. हे लॉकर फक्त दोन चावीच्या मदतीनं उघडलं जातं. बँकेचा सेवा व्यवस्थापक असलेल्या मनोज मारुती म्हस्के हा मुख्य आरोपी आहे. तर दुसरा आरोपी फरीद शेख हा मनोज म्हस्केचा मित्र आहे. नाहूर येथील रुणवाल ग्रीन्स येथे असलेल्या एसबीआय पर्सनल बँकिंग शाखेच्या मुलुंड शाखेत प्रशासक म्हणून काम करणाऱ्या अमित कुमार यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सोनं गहाण ठेवल्याची आरोपीची कबुली : आरोपी मनोज म्हस्के रजेवर असताना कुमारनं 27 फेब्रुवारी रोजी लॉकरची देखभाल केली. त्याबद्दल कोअर बँकिंग सिस्टम (CBS) मध्ये एक नोट देखील दाखल केली. त्यानंतर कुमार लॉकरमध्ये रोख रक्कम आणि दागिने जमा करण्यासाठी गेले असता त्यांना सोन्याच्या दागिन्यांची अनेक पॅकेटं गायब असल्याचं दिसलं. त्यांनी कागदपत्रांची नीट तपासणी केली असता शाखेनं 63 जणांना सोन्यावर कर्ज दिलं होतं. परंतु, लॉकरमध्ये फक्त 4 सोन्याची पॅकेटं असून उर्वरित 59 पॅकेटं गहाळ असल्याचं त्यांना आढळलं. यानंतर कुमार यांनी मनोज म्हस्के यांना चौकशीसाठी बोलावलं. तेव्हा त्यानं त्याच्या वैयक्तिक वापरासाठी सोन्याची 59 पॅकेटं घेतल्याचं सांगितले. त्यानं सोनं गहाण ठेवलं असून सोनं विकल्याचं सांगितलं. येत्या सात दिवसांत ते परत करेन, असंही म्हस्के यानं सांगितलं. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर कुमार यांनी भांडुप पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी आरोपी म्हस्केला अटक करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग; मेळघाटात दारुड्या मुलानं केली आईची हत्या
- कर परतावा लुबाडणाऱ्या विक्रीकर अधिकाऱ्यासह 16 जणांवर एसीबीकडून गुन्हा दाखल