मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिश्नोई गँगनं हत्या घडवून आणल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 14 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यात आता पुन्हा एका आरोपीला बेड्या ठोकण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी पंजाबमधून एका आरोपीला अटक केली आहे. सुजीत कुमार असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मुंबई पोलिसांनी त्याला पंजाबमधील लुधियानामधील सुंदर नगरमधून अटक केली असून त्याला मुंबईत आणलं जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला दिली आहे. तर दुसरीकडं मुंबई पोलिसांनी राम फुलचंद कनौजिया या आरोपींच्या घरातून शस्त्र जप्त केली आहेत.
मुंबई पोलिसांनी लुधियानातून आरोपीला केलं अटक :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आणखी सुजीत कुमार या आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. सुजीत कुमार या आरोपीला मुंबई पोलिसांनी लुधियानातील सुंदरनगर इथून अटक केली आहे. त्याला पंजाब पोलिसांच्या मदतीनं बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर त्याल जमालपूर इथल्या पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. मुंबई पोलीस सुजीत कुमारला घेऊन मुंबईकडं निघाले आहेत. सुजीत कुमारला अटक केल्यानंतर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.