मुंबई Mumbai Bomb Threat : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला आज (19 मे) सकाळी धमकीचा फोन आला. पुन्हा एकदा खळबळ उडाल्याचं बघायला मिळालं. एका अज्ञात कॉलरनं कॉल करून मुंबईतील दादर भागात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये स्फोट होणार असल्याची माहिती दिली. मात्र, घटनास्थळी कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळून आली नाही.
नेमकं काय घडलं? : एका अज्ञात व्यक्तीनं मुंबई पोलिसांना कॉल करून दादर सारख्या गजबजलेल्या गर्दीच्या ठिकाणातील मॅकडोनाल्ड बॉम्बनं उडवणार असल्याचं सांगितल्यानं पोलिसांमध्ये तारांबळ उडाली. अज्ञात व्यक्तीनं कॉलवर सांगितलं की, तो बेस्टच्या बस क्रमांक 351 मधून प्रवास करत असताना दोन व्यक्ती मॅकडोनाल्ड उडवण्याबाबत चर्चा करत असल्याचं त्यानं ऐकलं. याबाबतची माहिती अज्ञात कॉलरनं मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून दिली. ही माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट झाले. तपासाची चक्र वेगानं फिरवली. मात्र, यावेळी कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यामुळं आता मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देणाऱ्या अज्ञात कॉलरचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.