महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MP Navneet Rana : नवनीत राणा भाजपामध्ये जाण्यासाठी सज्ज; अपक्ष लढण्याचीही तयारी - MP Navneet Rana

MP Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपामध्ये जाऊन कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास सज्ज झाल्या आहेत. चार दिवसांपासून त्यांनी तसे संकेत देखील दिले आहेत. शनिवारी सायंकाळी तर भाजपा प्रवेशाची अधिकृत घोषणाच राणा करणार, असं वातावरण निर्माण करण्यात आलं.

MP Navneet Rana
नवनीत राणा

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 6:56 PM IST

अमरावतीMP Navneet Rana:खरंतर सर्वोच्च न्यायालयानं खासदार नवनीत राणा यांच्या जातीच्या प्रमाणपत्राचा निकाल राखून ठेवला असल्यामुळे त्यांच्याबाबत भाजपाकडून अतिशय सावध भूमिका घेतली जात आहे. आता आणखी काही दिवस या निकालाची प्रतीक्षा केली जाणार आहे. जर निकाल आता आठ, दहा दिवसात आलाच नाही तर भाजपाचा पाठिंबा घेऊन अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी देखील खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

शनिवारी रंगला होता 'सेंड ऑफ सोहळा' :'निर्णय घेणार दिशा ठरवणार' अशी टॅगलाईन वापरून आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं शनिवारी सायंकाळी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन परिसरात खासदार नवनीत राणा यांच्या राजकीय भूमिकेबाबत पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा खास मेळावा आयोजित करण्यात आला होता. रात्री दहा पर्यंत रंगलेल्या या मेळाव्यात राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डोळ्यात अश्रू आणत अतिशय भावनिक भाषणे केलीत. खासदार नवनीत राणा आता भाजपामध्ये जाणार, आमच्या पक्षात नसणार असा सर्वांच्या भाषणातील सूर होता. खासदार नवनीत राणा यांच्यासाठी खास सेंड ऑफ सोहळा आयोजित केला की काय असाच सारा माहोल होता. नवनीत राणा आपल्या भाषणात भाजपामध्ये जाणार अशी घोषणा करणार असं वाटत असताना त्यांनी याबाबत कुठलंही भाष्य केलं नाही.

पण नवनीत राणांचं स्पष्टीकरण नाही :युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष असणारे आमदार रवी राणा यांनी भाजपा आणि भाजपाच्या मित्र पक्षातील सर्वांना नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी एका मंचावर बसवून दाखवणार असं वक्तव्य केलं. नवनीत राणा यांनी मात्र भाजपामध्ये जाणार की नाही? याबाबत चकार शब्द देखील काढला नाही. एकूणच या मेळाव्याची नेमकी कोणती दिशा होती आणि काय निर्णय झाला? याबाबत पक्षाच्या कुठल्याही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अद्यापही कळलं नाही.


चार मार्चलाच भाजपामध्ये प्रवेशाची होती तयारी :खासदार नवनीत राणा यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून घड्याळ या चिन्हावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्या या पहिल्या निवडणुकीतच शिवसेनेचे निवडणुकीतील तत्कालीन उमेदवार आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2014 च्या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या. 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून 'पाना' या चिन्हावर खासदार नवनीत राणा या निवडणूक रिंगणात होत्या. 2019 मध्ये त्यांनी निवडणुकीत बाजी मारली आणि निवडून येताच केंद्रात सत्तेवर असणारे नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला.

राणांना भाजपाची भक्कम साथ :केंद्रातील भाजपा सरकारला आणि महाराष्ट्रात युती शासनाला राणा दाम्पत्यानं पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या हक्काचे मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान त्यांच्यापासून दुरावले. आता 2024 मध्ये निवडून येण्यासाठी भाजपाची भक्कम साथ खासदार नवनीत राणा यांना हवी आहे. यामुळे त्यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश घेण्याची तयारी केली. चार मार्चला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा नागपूरला येणार म्हणून अमरावती शहरातून शेकडो वाहनांच्या ताफ्याद्वारे हजारो कार्यकर्ते नवनीत राणा यांनी नागपूरला नेले होते; मात्र ऐनवेळी जे पी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द झाला. भाजपाचे अध्यक्ष चार मार्चला नागपूरला आले असते तर कदाचित नवनीत राणा यांची त्याच दिवशी भाजपामध्ये जाण्याची तयारी होती, असं त्यांचेच निकटवर्तीय सांगत आहेत.


निवडणूक लढण्याची तयारी :खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला निकाल नेमका काय असेल, याबाबत भाजपाच्या वतीनं गांभीर्याने विचार केला जातो आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वीच नवनीत राणा यांची उमेदवारी घोषित केली आणि न्यायालयाचा निकाल राणांच्या विरोधात आला तर संपूर्ण देशभर आपली गोची होईल हे भाजपाला ठाऊक असल्यामुळे सध्या तरी नवनीत राणा यांच्याबाबत भाजपामधील एकही नेता काहीही बोलायला तयार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर निवडणुकीपर्यंत आलाच नाही तर अशा परिस्थितीत नवनीत राणा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. 'पाना' या चिन्हासह निवडणुकीच्या अर्जासाठी अनेक चिन्ह निश्चित करण्यात आल आहेत. ही निवडणूक अपक्ष लढण्याची वेळ आली तरी भाजपासह भाजपाच्या सर्व मित्र पक्षांचा आपल्यालाच पाठिंबा राहील, असा विश्वास खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे बाळगून आहेत.

हेही वाचा :

  1. Electoral Bond Case: इलेक्टोरल बाँड्स प्रकरणी एसबीआयवर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; सर्व माहिती देण्याचे आदेश
  2. Sanjay Raut News: आर आर पाटील यांच्याप्रमाणं धाडस दाखवून ऑनलाईन गेमिंग ...संजय राऊत यांची राज्य सरकारकडं मागणी
  3. Seat sharing of Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं ठरेना, वाचा कुणाला पाहिजे कोणती जागा, कसा सुटणार तिढा

ABOUT THE AUTHOR

...view details