बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले या आरोपींना पकडण्यात आलं आहे. या आरोपींच्या सीआयडी कोठडीत वाढ करण्यात आली. यामध्ये विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यात 10 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी देण्यात आली. तर खून प्रकरणातील जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले या आरोपींना 18 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
विष्णू चाटेंनी करुन दिले वाल्मिक कराडसोबत बोलणे : या सुनावणी दरम्यान दोन्हीही वकिलांनी व्यक्तिवाद केला. त्यामध्ये खंडणी प्रकरणातील गुन्ह्यात विष्णू चाटे आणि इतरांनी वाल्मिक कराड याच्याशी बोलणं करून दिले, असं निष्पन्न झालं. वाल्मिक कराड यानं खंडणी मागितली. त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली, असा दावा करण्यात आला. हे सगळे गुन्हे एकमेकांशी निगडित आहेत. त्यामुळे या आरोपींच्या कोठडीत वाढ मिळणं आवश्यक आहे, असा युक्तिवाद तपास अधिकारी आणि त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.
सिद्धार्थ सोनवणे याचा संतोष देशमुख खून प्रकरणाशी काय आहे संबंध : मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला. त्यांच्याच गावातील असलेला सिद्धार्थ सोनवणे हा या आरोपींना सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन दिल्याचं निष्पन्न झालं आहे. ही सर्व घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील सिद्धार्थ सोनवणे हजर होता. त्यानंतर त्याला काही कुणकुण लागल्यानंतर त्यानं मस्साजोग इथून पळ काढला. तब्बल 15 दिवस तो बाहेरगावी फिरत होता. यावेळी त्यानं अनेक सिमकार्ड देखील बदलले. आपण एक प्रामाणिक आहोत म्हणून त्यानं कल्याण इथल्या एका रसवंतीच्या गाड्यावर काम केलं. मात्र या सर्व घटनांची माहिती गावातीलच व्यक्तीकडून दिल्यामुळे या खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये त्याचं देखील नाव आलं आहे.
हेही वाचा :