छत्रपती संभाजीनगरAdarsh Credit Institution Case : पतसंस्थांमध्ये गोरगरिबांचे अडकलेले पैसे परत द्या, या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात पोलिसांना अश्रू धुराचे नळकांडे फोडण्याची वेळ आली. खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत दुपारी आंदोलन सुरू झाल्यानंतर आंदोलनाला वेगळं वळण लागलं. मागील काही महिन्यात अनेक पतसंस्था बुडाल्या असून त्यामध्ये हजारो लोकांचे कोट्यावधी रुपये अडकलेले आहेत. मात्र, प्रशासन कुठल्याही हालचाली करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणी बाहेर येऊन उत्तर द्यावं, असा हट्ट खासदार इम्तियाज जलील यांनी धरला. तेव्हा विभागीय आयुक्त बाहेर न आल्यानं जमलेले ठेवीदार आक्रमक झाले. ठेवीदार पोलीस बंदोबस्ताला बगल देत, थेट विभागीय आयुक्तालयात दाखल झाले. त्यामुळं एकच गोंधळ निर्माण झाला.
आंदोलक झाले संतप्त :गेल्या काही महिन्यांत आदर्श नागरी पतसंस्था दिवाळखोरीत निघाल्यानं हजारो लोकांचे बँकेत ठेवलेले पैसे अडकले आहेत. ठेवीदारांनी याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. दुपारी दोनच्या सुमारास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केलं. या वेळी ठेवीदारांनी मत मांडली. खासदार जलील यांनी या प्रकरणी प्रशासन चलढकल करत असल्याचा आरोप केला. मुख्य आरोपी अंबादास मानकापे यांना अटक करण्यात आली असली, तरी मंडळाच्या इतर सदस्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या मालमत्ता अद्याप का विकल्या नाहीत, असा संतप्त सवाल जलील यांनी उपस्थित केला.