अमरावतीतून निघाली आस्था एक्सप्रेस अमरावती Aastha Special Train : जय श्रीरामच्या घोषणा देत आज सकाळी पाच वाजता अमरावती रेल्वे स्थानकावरून जिल्ह्यातील 1507 राम भक्तांना घेऊन 'आस्था एक्सप्रेस' अयोध्येला निघाली. खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी या गाडीला भगवा झेंडा दाखवला. अमरावतीवरून अयोध्येला जाणाऱ्या राम भक्तांमध्ये यावेळी प्रचंड उत्साह होता.
पहाटे तीन वाजल्यापासून लगबग : अमरावतीसह अचलपूर, धारणी, चिखलदरा, तिवसा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, मोर्शी, वरुड अशा सर्वच तालुक्यातून अयोध्येला जाण्यासाठी राम भक्त मंगळवारी रात्रीपासूनच अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. रात्री रेल्वे स्थानकावर राम भक्तांनी भजन केलं. पहाटे तीन वाजल्यापासून अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांची लगबग रेल्वेस्थानकावर सुरू झाली. अयोध्याला जाणाऱ्या सर्व राम भक्तांना टिळा लावून त्यांच्या गळात तुळशी माळा घालण्यात आल्या.
27 तासात पोहोचणार आयोध्या: अमरावती रेल्वे स्थानकावरुन आज सकाळी पाच वाजता निघालेली 'आस्था एक्सप्रेस' अयोध्येला गुरुवारी सकाळी आठ वाजता पोहोचणार आहे. 27 तासांच्या या प्रवासाला अमरावती जिल्ह्यातील पंधराशे सात राम भक्त निघाले असून त्यांच्या सेवेसाठी रेल्वेचे एकूण 56 कर्मचारी गाडीमध्ये आहेत. या गाडीत मधात कुठंही प्रवासी बसणार नाहीत. मात्र अमरावती रेल्वे स्थानकावरुन निघाल्यावर ही गाडी वर्धा, नागपूर आणि इटारसी रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. 10 फेब्रुवारीला रात्री दहा वाजता ही गाडी या प्रवाशांना घेऊन पुन्हा अमरावतीकडं निघणार आहे.
राम भक्तांना विशेष सुविधा : या गाडीनं अयोध्येला निघालेल्या अमरावतीकर राम भक्तांना जाण्या येण्याचं तिकीट केवळ पंधराशे नव्वद रुपये आहे. चार दिवसांच्या या प्रवासात राम भक्तांना जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था आहे. या गाडीमध्ये अमरावती रेल्वे स्थानकावरुनच खाण्यापिण्याचं सर्व साहित्य सोबत घेण्यात आलं आहे. रामभक्त प्रवाशांना सकाळच्या नाश्त्याचं पाकीट स्वतः खासदार अनिल बोंडे यांनी प्रत्येक बोगीच्या दाराशी जाऊन राम भक्तांच्या टीम लीडरला वितरित केलं.
अमरावतीकरांसाठी भाग्याचा दिवस : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला अयोध्येत राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा केल्यावर, प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अमरावतीकरांना थेट अयोध्येला जाण्यासाठीचा दिवस आज उजाडला आहे, असं," अनिल बोंडे यांनी सांगितलं. अयोध्येला निघालेला हा राम भक्तांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देण्यासाठी आम्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर आलो आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीकरांसाठी 'आस्था स्पेशल' रेल्वेची सुविधा करुन दिल्यामुळं जिल्ह्यातील सर्व राम भक्तांना अयोध्येला जाण्याची संधी मिळाली.
रेल्वे स्थानकावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : पहाटे तीन वाजल्यापासून अमरावती रेल्वे स्थानकावर अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांसह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. यावेळी कुठलाही गोंधळ उडू नये, यासाठी अमरावती शहर पोलिसांचा रेल्वे स्थानकाबाहेर कडेकोट बंदोबस्त होता. अग्निशमन दलाचे वाहन देखील रेल्वे स्थानकाबाहेर तैनात करण्यात आलं होतं. रेल्वे पोलिसांच्या वतीनं फलाटावर जाणाऱ्या प्रत्येक राम भक्ताची ओळख पटवून त्यांना आत सोडण्यात आलं. अयोध्येला सुटणाऱ्या या विशेष गाडीच्या निमित्तानं संपूर्ण रेल्वे स्थानकावर रोषणाई करण्यात आली होती.
हेही वाचा -
- रामलल्लाच्या जयघोषात मुंबईतून पहिली "आस्था ट्रेन" अयोध्येला रवाना
- चेन्नई ते तिरुनेलवेली वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, डब्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
- राम मंदिराच्या उद्घाटनावेळी अयोध्येत जाताय? थांबा 'हे' नियोजन केलं नाही तर होणार गैरसोय