चंद्रपूर Mosquito Net : चंद्रपूर जिल्हा हा मलेरिया आणि डेंगूच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णांच्या जिल्ह्यात चंद्रपूरचा समावेश होतो. त्यामुळं यावर आळा घालता यावा म्हणुन प्रतिबंधक उपाययोजना करणं आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून संवेदनशील असलेल्या भागात मच्छरदाणीचं वाटप करण्यात येतं. मात्र जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाची साथ सुरु झाली असली तरी चंद्रपूर जिल्हा मच्छरदाणीच्या प्रतीक्षेत आहे. या वर्षी जिल्हा हिवताप विभागाच्या वरीष्ठ स्तरावर 90 हजार मच्छरदाणीची मागणी केली होती. मात्र, अद्याप एकही मच्छरदाणीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळं शासनाच्या संवेदनशीलतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.
चंद्रपूर जिल्ह्याला 90 हजार मच्छरदाणींची प्रतीक्षा; जिल्ह्यात 132 डेंग्यू तर 252 मलेरियाचे रुग्ण संक्रमित - Mosquito Net issue - MOSQUITO NET ISSUE
Mosquito Net : चंद्रपूर जिल्हा हा मलेरिया आणि डेंगूच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. मात्र, जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाची साथ सुरु झाली असली तरी चंद्रपूर जिल्हा मच्छरदाणीच्या प्रतीक्षेत आहे.
Published : Jul 11, 2024, 8:08 PM IST
मलेरिया आणि डेंग्यूचं प्रमाण अधिक : डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव पसरविनाऱ्या मच्छरांचा प्रसार हा साठवलेल्या पाण्यातुन होत असतो. चंद्रपूर जिल्हा हा दुर्गम जिल्हा असून जंगलानं वेढलेला आहे. त्यामुळं इथं मलेरिया आणि डेंग्यूचं प्रमाण अधिक आहे. सध्या जिल्ह्यात तब्बल 252 मलेरियाचे रुग्ण असून डेंग्यूने ग्रस्त रुग्णांची संख्या ही 132 इतकी आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे. यापासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी वितरणाचा कार्यक्रम केंद्र सरकारच्या माध्यमातून दर तीन वर्षांनी राबविण्यात येतो. यावर्षी पावसाळा आला तरी त्याची पुर्तता शासनानं अद्याप केलेली नाही. 2023 मध्ये 90 हजार मच्छरदाणीची मागणी जिल्हा हिवताप कार्यालयानं केली होती. मात्र वर्ष लोटले तरी अद्याप एकही मच्छरदाणी जिल्ह्याला मिळाली नाही. त्यामुळं आता फवारणी आणि औषधी वितरणाच्या भरवशावरच ही मोहीम चालविण्याची पाळी हिवताप कार्यालयावर आली आहे.
मागणी एक लाख 10 हजार मिळाले 78 हजार : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू मलेरिया पसरविणाऱ्या मच्छरांपासून बचाव करण्यासाठी दर तीन वर्षांत शासनाकडून मच्छरदाणीचं वितरण केल्या जातं. जे भाग संवेदनशील आहेत, अशा ठिकाणी त्याच्या लोकसंख्येच्या अनुपातानुसार त्याची मागणी केली जाते. 2020-21 या वर्षी जिल्ह्यासाठी 1 लाख 10 हजार मच्छरदाणीची मागणी करण्यात आली. मात्र, या मागणीवर कात्री चालवत शासनानं केवळ 78 हजार मच्छरदाणी उपलब्ध करुन दिल्या आहेत.
फवारणी कार्यक्रमातही कपात : पूर्वी पावसाळा लागण्यापूर्वीच नालीत औषधफवारणी आणि फोग मशीन चालविण्यात येत होती. तसंच साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडले जायचे. मात्र आता या कार्यक्रमात शासनानं कपात केल्याचं दिसून येत आहे. ज्या ठिकाणी मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळतात अशा संवेदनशील ठिकाणीच हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात असल्याचं चित्र आहे.
37 संवेदनशील गावांचा समावेश :या वर्षी डेंग्यू आणि मलेरियाच्या दृष्टीनं संवेदनशील असलेल्या 37 गावांचा समावेश करण्यात आला आहे. यात जिवती, कोरपना, राजुरा, मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड आणि ब्रम्हपुरी या नऊ तालुक्यांचा समावेश आहे. 37 संवेदनशील गावात फवारणी आणि अन्य उपाय करायचे आहेत. मात्र आत्तापर्यंत केवळ 8 गावांमध्येच ही फवारणी आणि प्रतिबंधक कार्यक्रम झाला आहे. इतक्या संथगतीनं काम झाल्यास रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण : 2022 मध्ये डेंग्यूचे रुग्ण 100 होते. 2023 मध्ये 380 तर सध्या 2024 मध्ये 132 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. यापैकी एकही रुग्ण दगावला नाही. तर 2022 मध्ये 121 जणांना मलेरियाची लागण झाली, 2023 मध्ये 159 जणांना मलेरिया झाला. यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला तर 2024 च्या सुरुवातीला तब्बल 252 जणांना मलेरियाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. जुलै महिन्याचा अर्धा कालावधी लोटला आहे. मात्र मच्छरदाणीचा अद्याप पत्ता नाही. जे भाग संवेदनशील आहेत, तिथं आथिर्करित्या दुर्बल घटक राहतात. ते मच्छरदाणी घेऊ शकत नाही. अशा लोकांना त्याचा पुरवठा करणे अत्यावश्यक आहे. मात्र मागणीनुसार ह्या मच्छरदाणी कधी मिळणार याबाबत अद्यापही कुठली स्पष्टता शासनाकडून मिळू शकली नाही.
हेही वाचा :