शिर्डी(अहमदनगर) Pomegranates Farming : संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथील शेतकरी नेहमीच शेतीत विविध प्रयोग राबविण्यात अग्रेसर असतात. असाच फळबागेचा यशस्वी प्रयोग मोहन जनार्दन लामखडे व श्याम लामखडे या बंधूंनी केला आणि थेट आखाती देशात डाळिंब पोहचले. दीड एकरात 12 लाखांचे उत्पन्न घेतले असून प्रतिकिलोस 111 रुपयांचा भाव मिळाला आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर ही किमया केली आहे.
वाहून जाणाऱया पाण्याचा योग्य वापर : संगमनेर तालुक्यातील बोटा गावांतर्गत असलेल्या केळेवाडी हे द्राक्षांचे आगार म्हणून ओळखले जात होते. मात्र, कालंतराने येथील शेतकरी इतर पिकांकडेही वळू लागले. मोठ्या प्रमाणावर डाळिंब बागा फुलल्या आहेत. मोहन व श्याम लामखडे हे बंधू उच्चशिक्षित असतानाही त्यांनी शेती करण्याचे ठरवले आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते शेती करत आहेत. दीड एकर क्षेत्रात त्यांनी सेंद्रीय डाळिंब केले आहे. मागील वर्षी ओढ्याला वाहून जाणारे पाणी त्यांनी विद्युत मोटारीच्या माध्यमातून उचलून थेट शेततळ्यात सोडले आणि शेततळे भरून घेतले. त्यावर ठिबक सिंचनच्या माध्यमातून डाळिंब शेती फुलवली आहे. त्यातच यावर्षी उन्हाळाही कडक होता. त्यामुळे शेवटी पाण्याची कमतरता असताना देखील डाळिंब अतिशय चांगले फुलवले. प्रत्येक झाडाला मोठ्या संख्येने डाळिंब आले. व्यापाऱ्याने थेट डाळिंब बागेत येवून संपूर्ण डाळिंब खरेदी केले आहे.
संगमनेर डाळिंब उत्पादन (ETV Bharat Reporter) लाखो रुपयांचं उत्पन्न : या डाळिंबाला प्रतिकिलोस 111 रुपयांचा बाजारभाव मिळाला आहे. जवळपास बारा टन डाळिंब गेले असून एकूण बारा लाख रुपये झाले आहेत. डाळिंब लागवडीसाठी खते-औषधे, फवारणी, मजुरी असा एकूण तीन लाख रुपये खर्च झाला आहे. तरी नऊ लाख रुपये नफा मिळाला आहे. लामखडे बंधूंनी फुलवलेल्या डाळिंबांना चमकही अतिशय चांगली होती. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक शेतकरी डाळिंब बागेला भेटी देऊन लामखडे बंधूंचे कौतुक करत आहेत. गेल्या चार वर्षांपासून हे बंधू डाळिंबाची शेती करत असून, दरवर्षी ते डाळिंबातून चांगले पैसे कमवत आहेत. पाणीटंचाई असताना देखील त्यांनी केवळ वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्यावर डाळिंबाची शेती फुलवली असून त्यांना कुटुंबाचीही चांगली साथ मिळत आहे.
संगमनेर डाळिंब उत्पादन (ETV Bharat Reporter) डाळिंबाला चांगला बाजारभाव : "नेहमीच आम्ही दोघा बंधूंनी शेतीमध्ये विविध प्रयोग राबवले आहेत. त्या माध्यमातून चांगले पैसेही मिळत गेले. डाळिंबासाठी खूप मेहनत घेतली आहे. शेवटी पाण्याचीसुद्धा कमतरता भासली होती. त्यावरही आम्ही मात करून डाळिंबाची शेती अतिशय चांगल्या प्रकारे फुलवून दाखवली आणि त्यामुळेच डाळिंबाला चांगला बाजारभाव मिळाला. दरवर्षी आम्ही वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उपयोग डाळिंब बागेला करत आहोत. जिद्द, चिकाटी आणि खूप मेहनत करण्याची तयारी असल्यास यश हमखास मिळतं," असं डाळिंब उत्पादक शेतकरी मोहन लामखडे यांनी सांगितलं.
हेही वाचा -Benefits of Pomegranate: हेल्दी लाइफस्टाइल हवी? मग करा 'या' फळाचे सेवन