हवालामार्गे जाणारे ३९ लाख रुपये जप्त (Source- ETV Bharat Reporter) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघाचा प्रचार शनिवारी संपला. प्रचार संपत असताना शनिवारी रात्री उशिरा शहरातील पैठण गेट परिसरात पोलिसांनी सुमारे 40 लाख रुपयांची रोकड पकडली. हवालाच्या माध्यमातून ही रक्कम पाठवण्यात येणार होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली. गेल्या दहा दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू होत्या. त्यावरून सापळा रचून कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
पैसे केले जप्त-छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात सोमवारी (13 मे) मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या .याला काही तास होत नाही तोच रात्री उशिरा पैठण गेट येथे मोबाईल शॉपी परिसरातील एका दुकानात सुमारे 40 लाख रुपयांची रोख जप्त करण्यात आली. यासह सहा मोबाईल, पैसै मोजायची मशिन असे साहित्य होते. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. रमेश खंडूजी बुधवंत, शैलेश भरतलाल राठोड, अस्लम खान इस्माईल खान आणि शेख रिझवान शेख शफी अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. ही रक्कम कुठून आणली? कुणाची आहे? याबाबत रात्री उशिरापर्यंत संबंधितांची चौकशी सुरू होती.
कुरिअर कंपनीच्या माध्यमातून जाणार होते पैसे-निवडणुकीच्या काळात रोख रक्कम बाळगण्यावर अनेक निर्बंध लावण्यात आलेले असतात. असं असताना देखील पैठणगेट येथील एका खासगी कुरिअर कंपनीच्या कार्यालयात 39 लाख 65 हजार इतकी रोख रक्कम आढळून आली. गेल्या काही दिवसात संशयास्पद हालचाली येथे चालू होत्या. त्यावरून पोलिसाच्या विशेष पथकाकडून गेल्या दहा दिवसात पाळत सुरू होती. निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून शनिवारी रात्री अकराच्या सुमारास पोलिसांच्या पथकानं कुरियर कार्यालय आणि मोबाईल दुकानावर छापा टाकून कारवाई केली. जप्त केलेली रक्कम नेमकी कुठे पाठवण्यात येणार होती? याबाबत अधिक तपास पोलिसांनी सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली. ही कारवाई पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक सुनिल माने आणि पीएसआय प्रशांत मुंडे यांनी केली.
हेही वाचा-
- 'छत्रपतींच्या आशिर्वादाने झाकीर नाईकच्या अवलादींचे सगळे काळे धंदे बंद करणार', भाजपा नेते मिहीर कोटेजा यांचे वक्तव्य - Mihir Koteja Statement
- "राज ठाकरेंच्या भूमिकेमुळं बाळासाहेबांच्या आत्म्याला...'; संजय राऊतांची टीका - Sanjay Raut